पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी
डॉ. योगेश म्हसे यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी बदली

पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्तपदी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने बुधवारी (दि. ४) सायंकाळी यासंदर्भातील आदेश जारी केला.
पीएमआरडीएचे विद्यमान आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. जून २०२४ मध्ये त्यांनी तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडून पीएमआरडीएच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता.
डॉ. म्हसे यांच्या कार्यकाळात पीएमआरडीएच्या अनेक प्रकल्पांना गती देण्याचे काम करण्यात आले. सेक्टर १२ येथील गृहप्रकल्पांतील त्रुटींवर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या संथ कामांबाबत कंत्राटदार कंपनीला नोटीस बजावण्यात आली. अनधिकृत हॉटेल्स व होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली असून अनधिकृत बांधकामांवर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले.
हेही वाचा : महापालिकेच्या उत्पन्न वाढीसह शहर प्रदूषणमुक्तीवर भर; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती
नवनियुक्त आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी यापूर्वी सांगली व भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून आता त्यांची पीएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रस्तावित पुणे रिंग रोड प्रकल्प, माण–हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग, विविध गृहप्रकल्प, इंद्रायणी, पवना व मूळा नदी सुधार प्रकल्प तसेच २० नगररचना योजनांची अंमलबजावणी ही प्रमुख आव्हाने त्यांच्या समोर असणार आहेत.





