महापालिका कर संकलन विभागाची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी; ५०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी करीत तब्बल ५०० कोटी रुपयांच्या मिळकतकर वसुलीचा टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर संकलन विभागाकडून विविध योजना आणि मिळकतधारकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या ‘तिजोरीत’ मोठ्या प्रमाणात ‘गल्ला’ जमू लागला आहे.
कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी कर संकलन विभागाच्या कारभारात सूसुत्रता आणली असून, त्याचा फायदा कर वसुलीमध्ये झालेला दिसत आहे. मिळकतकर वसुलीसाठी देशमुख यांनी वसुली मोहीम राबवत असतानाच विविध योजना पिंपरी-चिंचवडकरांसाठी सुरू केल्या. या योजनांद्वारे मिळकतकरामध्ये सवलती देण्यात येत आहेत. त्या योजनांना पिंपरी-चिंचवडकरांचा प्रतिसाद मिळाला आणि विक्रमी मिळकतकर वसुली करण्यात आली.
मिळकतकर थकबाकीदार मिळकतधारकांना महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात कर संकलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, कर्तव्यनिष्ठपणे जबाबदारी पार पाडली. त्यामुळे करसंकलन विभागाची कामगिरी लक्षवेधी ठरली, अशी प्रतिक्रिया निलेश देशमुख यांनी दिली.





