आळंदी वडगाव रोडवरील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
पालक, शिक्षक यांची नगरपालिका आणि वाहतूक विभागाला मागणी

आळंदी | प्रतिनिधी
येथील वडगाव रोडवरील प्रियदर्शनी शाळेसमोरचा रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून, दररोज शेकडो विद्यार्थी जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करत आहेत. पालक आणि शिक्षकांनी या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपालिका आणि वाहतूक विभागाने तातडीने या बाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, त्यामुळे वाहनधारकांसह चालणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. याशिवाय, फूटपाथवर कचऱ्याचे ढीग असून, अनेकजण गाडीतून जाताना रस्त्यावरच कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.या रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक बंदी असतानाही ट्रक, डंपर यासारखी वाहने खुलेआम फिरत आहेत. शिवाय अनेक चालक वेगात व बेदरकारपणे वाहन चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे ना महापालिकेचे अधिकारी लक्ष देत आहेत, ना वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी तक्रार शिक्षक आणि पालकांनी केली.
हेही वाचा : “आमचा अजित पवारांच्या भूमिकेला कट्टर विरोध”; छगन भुजबळांचं वक्तव्य
आळंदी, वडगाव रोडवरील शाळा, महाविद्यालयांच्या वेळेत बुलेट रायडर्स मोठा आवाज करत ये-जा करतात. त्यामुळे वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते, परीक्षेच्या तयारीवर परिणाम होतो आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक दचकतात. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीमध्ये कंपनीकडून बसवलेला सायलेन्सर वापरणे बंधनकारक आहे. मात्र, काही रायडर्स बुलेटसोबत असलेला कमी आवाज करणारा मूळ सायलेन्सर काढून गोळीबारासारखा मोठा आवाज करणारे बदललेले सायलेन्सर बसवतात. त्यामुळे त्यांच्या बुलेटमधून निघणारा आवाज थेट गोळीबारासारखा वाटतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला या आवाजामुळे घाबरतात. शाळा परिसरात विद्यार्थ्यांना त्रास होतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने गंभीरतेने लक्ष घालून बुलेटच्या फटफटीला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत तक्रारी करुनही कोणतीही प्रशासकीय यंत्रणा याकडे लक्ष देत नाही. असाही आरोप केला जात आहे.
आमच्या मुलांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण हवे आहे. रस्ता दुरुस्त करा, कचरा हटवा आणि अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवा.
– माधुरी बोंद्रे, शिक्षिका, प्रियदर्शनी स्कुल आळंदी.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
हे फक्त शाळेपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण परिसराच्या आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न आहे. महापालिकेने आणि वाहतूक विभागाने संयुक्तरित्या कारवाई करून हे प्रश्न कायमचे सोडवावे.
– अश्विनी वायदंडे, शिक्षिका, प्रियदर्शनी स्कुल आळंदी.





