“आमचा अजित पवारांच्या भूमिकेला कट्टर विरोध”; छगन भुजबळांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal | मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) अंतर्गत वाद उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “ज्याला त्याला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं” अशी भूमिका मांडली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, की ठीक आहे, अजित पवारांना करायचं आहे ते करू द्या. परंतु, आमचा त्यांच्या भूमिकेला कट्टर विरोध आहे. आमची भूमिका ही कट्टर विरोधाची आहे. कारण आरक्षणाचं मूळ सामाजिक मागसलेपणात आहे. आर्थिक किंवा शैक्षणिक हे देखील निकष असले तरी सामाजिक मागास असणं आवश्यक आहे. सामाजिकरित्या मागास असणं हा पहिल्या क्रमांकाचा निकष आहे. त्यामुळे जे समाजिकरित्या मागास असतील त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा दणका; फार्मा कंपन्यांवर 100% टॅरिफ
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना अठरापगड जातीच्या लोकांना, बारा बलुतेदारांना आपल्याबरोबर घेतलं. त्याच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेऊन आपण पुढे गेलो तरच आपलं भलं होईल ही गोष्ट कृपा करून लक्षात घ्या. त्यामुळे कोणी जातीपातीच्या राजकारणात पडू नका. कोणी काही चुकीचं खूळ डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला सांगा आपण सगळी हाडामासाची माणसं आहोत, सगळ्यांचं रक्त लाल आहे, जातीच्या भानगडीत पडू नको.
जातीबद्दल बोलायचं झाल्यास प्रत्येकाला आदर मिळायला हवा. ज्याच्या त्याच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण मिळायला हवं. परंतु, यात कोणी राजकारण करत असेल तर त्याला आवर घालायला पाहिजे. मित्रांनो जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार करू नका, मी राजकारण करत असताना कधीच कोणाची जात-पात, नातंगोतं बघितलं नाही, बघत नाही. मी केवळ माणूस बघतो आणि त्याची मदत करतो, असं अजित पवार म्हणाले.





