पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात भाजपा पक्ष संघटनेत आमदार महेश लांडगे यांची ‘‘मजबूत पकड’’
‘‘संघटन ही शक्ती है’’ चा नारा : शहर कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीमध्ये समर्थकांना मोठी संधी
पुणे । अधिकराव दिवे-पाटील । पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे मातब्बर नेते आणि हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी पक्ष संघटनेवर चांगलीच पकड निर्माण केली आहे. विधानसभा निवडणूक 2024 नंतर शहर कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये लांडगे समर्थकांना मोठी संधी मिळाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा लक्षवेधी ‘‘परफॉर्मन्स’’ करेल, असा दावा केला जात आहे.
भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना जबाबदारी देण्यामध्ये महेश लांडगे यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडीमध्ये निष्ठावंत गटातील माजी नगरसेवक, पदाधिकारी इच्छुक होते. मात्र, महेश लांडगे यांनी शत्रुघ्न काटे यांच्या पारड्यात वजन टाकले आणि त्यांच्या शहराध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, शहर कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारिणीमध्ये युवा मोर्चा शहराध्यक्षपदी लांडगे यांचे कट्टर समर्थक दिनेश यादव यांना संधी दिली आहे. तसेच, सरचिटणीसपदी दुसरे समर्थक विकास डोळस आहेत. त्यामुळे शहर कार्यकारिणीमध्ये लांडगे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. विशेष म्हणजे, पक्षाच्या शहर संघटनेवर पकड मिळवून एकप्रकारे महेश लांडगे यांनी शहर भाजपाचा ‘‘रिमोट’’ आपल्या हातात ठेवला आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.
भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी उत्तर पुणे जिल्हा संघटनेची जबाबदारी जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांना दिली आहे. पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असलेले प्रदीप कंद हेसुद्धा आमदार लांडगे यांची निकटवर्ती आहेत. त्यानंतर आता जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी गणेश कवडे यांची निवड झाली आहे. अष्टविनायक देवस्थानमधील ओझरचा विघ्गहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून गणेश कवडे संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहेत. कवडे आणि लांडगे यांच्यात जीवलग मैत्री आहे, हेही सर्वश्रृत आहे.
हेही वाचा: “आमचा अजित पवारांच्या भूमिकेला कट्टर विरोध”; छगन भुजबळांचं वक्तव्य
भाजपा संघटनेचे महत्त्व अधोरेखित….
आमदार महेश लांडगे यांनी भाजपामध्ये संघटनेचे महत्त्व जाणले आहे. त्यामुळेच शहर आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये संघटनेच्या कार्यात ते कमालीचे सक्रीय झाले आहेत. यापूर्वी, पश्रश्रेष्ठींच्या सूचनेप्रमाणे गोव विधानसभा निवडणूक, मध्यप्रदेश, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतसुद्धा भाजपा पक्षश्रेष्ठींनी लांडगे यांच्यावर जबाबदारी दिली होती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ च्या निमित्ताने महेश लांडगे यांची ओळख सर्वदूर पोहोचली आहे. त्यामुळे भाजपा संघटनेत ‘‘डिसिझन मेकर’’ म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते.





