पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्ज अन् दायित्वबाबत स्पष्ट खुलासा करावा : माजी महापौर राहुल जाधव
महापालिका सर्वसाधारण सभा : अर्थसंकल्पीय चर्चेत विविध मुद्यांवर लक्ष वेधले

पिंपरी-चिंचवड | महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत माजी महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेवरील कर्ज आणि दायित्वाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडून सविस्तर खुलासा करण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या दायित्वाखाली असल्याच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे जाधव यांनी नमूद केले.
सभागृहात प्रश्न उपस्थित करताना त्यांनी विचारले की, प्रत्यक्षात महापालिकेवर किती कर्ज आहे आणि एकूण दायित्व किती आहे, याची स्पष्ट आणि अधिकृत माहिती प्रशासनाने द्यावी. अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे शहराची प्रतिमा खराब होत असल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली.
हेही वाचा : एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
तसेच, महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, जाधव यांनी पुढे विचारले की, वाढत्या दायित्वाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने कोणत्या ठोस उपाययोजना आखल्या आहेत? आर्थिक शिस्त राखण्यासाठी कोणते धोरण अवलंबले जात आहे? याबाबतही सविस्तर माहिती सभागृहात सादर करावी. महापौर आणि आयुक्तांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव यांनी बीआरटी, टीपी, रस्ते विकसित करताना विविध विभागांचा समन्वय सक्षम असावा. नवीन डीपी लागू करताना ताब्यात असलेली आरक्षणे विकसित झाली पाहिजे, याकडे लक्ष वेधले. विकासकामे करताना एखादा अधिकारी स्वत:ला मोठा समजत असेल, तर महापालिकेचे नुकसान आहे. महापालिकेच्या मिळकतींचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम आणि पारदर्शक ठेवणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. कर्ज आणि दायित्वाबाबत नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी प्रशासनाने स्पष्ट आणि अधिकृत आकडेवारी समोर मांडली पाहिजे. योग्य नियोजन, आर्थिक शिस्त आणि जबाबदार निर्णयांच्या माध्यमातून आपण हे दायित्व सक्षमपणे व्यवस्थापित करू आणि शहराच्या विकासाला कुठेही खीळ बसू देणार नाही.
– राहुल जाधव, माजी महापौर.





