Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दि सेवा विकास बँकेच्या चेअरमन, संचालक व अधिका-यांवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा

पिंपरी |प्रतिनिधी 

खातेदाराने बँकेत ठेवलेले त्याचे पैसे त्याच्या मागणीनुसार बँकेने देणे बंधनकारक आहे. मात्र दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेने सांगवी येथील एका खातेदाराला त्याच्या मागणीनुसार त्याचे पैसे दिले नाहीत. याप्रकरणी खातेदाराने दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा सांगवी या बँकेच्या चेअरमन, संचालक आणि बँकेच्या अधिका-यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी चिंचवड परिसरात असाच एक प्रकार घडला होता.

हिरा बसवराज नाईक (वय 66, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाईक यांनी दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या सांगवी शाखेत एकूण सहा मुदत ठेवी ठेवल्या होत्या. त्याची एकूण रक्कम 13 लाख 97 हजार 565 रुपये, एका ठेवीची मुदत पूर्ण झाल्याने त्याचे 55 हजार 529 रुपये व्याज तसेच बचत खात्यावरील एक लाख 52 हजार 307 रुपये असे एकूण 16 लाख पाच हजार 401 रुपये नाईक यांनी बँकेत ठेवले होते.

नाईक यांनी ठेवलेले पैसे नाईक यांना त्यांच्या मागणीनुसार देणे बँकेला बंधनकारक होते. मात्र वेळोवेळी मागणी करूनही बँकेने ते पैसे नाईक यांना परत दिले नाहीत. नाईक यांच्या मुदत ठेवी आणि बचत खात्यावरील पैशांचा बँकेने गैरवापर केला. यातून नाईक यांची 16 लाख पाच हजार 401 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 406, 409, 420, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button