सांडपाण्यामुळे पवना नदी प्रदूषित; नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका!
महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा: माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांचे उपोषण

राहुल काटे, सुरेश रानवडे यांचा उपोषणाला जाहीर पाठिंबा
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी थेट पवना नदीत मिसळत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक तुकाराम महादू भोंडवे यांनी सुरू केलेले उपोषण अधिक तीव्र होत आहे. पर्यावरणाबरोबरच हा प्रश्न आता सार्वजनिक आरोग्याचा आपत्कालीन विषय बनला असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
शहरातील विविध भागांतून निघणारे सांडपाणी योग्य प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जात असल्यामुळे पवना नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना त्वचारोग, पोटाचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर भोंडवे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवून, कोणतेही अशुद्ध पाणी नदीत जाणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.
हेही वाचा : बीकेसीमध्ये मेट्रोचं काम सुरु असताना क्रेन उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली
या आंदोलनाला राहुल काटे, सुरेश रानवडे, शांताराम भोंडवे, दत्तात्रय भोंडवे यांच्यासह अनेक नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाविरोधात आमचा लढा सुरूच राहील,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, वाढत्या दबावामुळे महापालिकेने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
“पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी थेट पवना नदीत मिसळत आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. ही केवळ पर्यावरणाची समस्या नसून सार्वजनिक आरोग्याचा आपत्कालीन प्रश्न बनला आहे. दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असूनही प्रशासन निष्क्रिय आहे. जर तात्काळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सक्षम करून नदीत जाणारे प्रदूषण थांबवले नाही, तर आम्ही हा लढा अधिक तीव्र करू. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही!”
– तुकाराम भोंडवे, माजी नगरसेवक.





