बीकेसीमध्ये मेट्रोचं काम सुरु असताना क्रेन उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई | अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गाच्या कामादरम्यान वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे मोठी दुर्घटना घडली. गर्डर उचलण्याच्या कामादरम्यान सुमारे ४०० टन वजनाची मोबाइल क्रेन यांत्रिक बिघाडामुळे उलटली. ही घटना पहाटे साडे चारच्या सुमारास एशियन हार्ट रुग्णालयाजवळ घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो २ ब प्रकल्पाचे काम हाती घेत असून या कामाअंतर्गत गर्डर स्थापित करताना क्रेनमध्ये बिघाड झाला आणि ती उलटली. भलीमोठी क्रेन रस्त्यावर कोसळल्याने परिसरातील रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बीकेसी परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
हेही वाचा : ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ४०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र
दरम्यान, क्रेन हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि एमएमआरडीएकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लवकरच क्रेन हटवून वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याचबरोबर, मेट्रो व इतर पायाभूत प्रकल्पांच्या कामादरम्यान कंत्राटदार जे. कुमार कंपनीकडून वारंवार निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामादरम्यान या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सातहून अधिक छोटे-मोठे अपघात झाले असून त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बीकेसी आणि मिरा-भाईंदर येथील उड्डाणपुलांच्या कामादरम्यानही अपघातांच्या घटना घडल्या होत्या. या निष्काळजीपणाबद्दल कंपनीवर सहा ते सात कोटी रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नसल्याची चर्चा आहे.





