‘नर्सिंग होम अॅक्ट’च्या अंमलबजावणीकडे रुग्णालयांचे दुर्लक्ष

पिंपरी : शहरातील काही खासगी रुग्णालये नर्सिंग होम अॅक्टच्या तरतुदींचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे. रुग्णालयांमध्ये दर्शनी बाजूला उपचार शुल्काचा तक्ता प्रदर्शित न करणे, वैध अग्नीसुरक्षा प्रमाणपत्र न घेणे किंवा त्याचे नूतनीकरण करून न घेणे, उघड्यावरच जैववैद्यकीय कचरा टाकणे असे प्रकार घडत आहेत.
महापालिका अग्निशामक दलाने शहरातील 570 नोंदणीकृत रुग्णालयांपैकी आत्तापर्यंत 403 रुग्णालयांना व्यवसाय अग्नीसुरक्षा प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा बजावल्यानंतर 197 रुग्णालयांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. तर, 94 रुग्णालयांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
बॉम्बे नर्सिंग होम नोंदणी कायदा, 1949 आणि महाराष्ट्र नर्सिंग होम (सुधारणा) नियम, 2021 अंतर्गत नोंदणीकृत सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुंबई आणि पुणे येथे बैठका घेऊन जानेवारी महिन्यात हे आदेश दिलेले आहेत. महापालिकांचे सर्व आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्यांचे सिव्हील सर्जन यांना हे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी आदेश जारी केले आहेत की, जिल्हास्तरीय पथकांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी तत्काळ सुरू करावी. कायद्यामध्ये नमूद केलेल्या तरतुदींचे रुग्णालयांकडून पालन होते आहे की नाही, याची तपासणी करायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.
शहरातून दररोज साडेतीन ते चार टन इतका जैववैद्यकीय कचरा गोळा केला जातो. शहरातील सुमारे 700 रुग्णालये आणि 2 हजार 500 दवाखान्यांतील बायोमेडिकल वेस्ट गोळा केले जाते. पास्को इन्व्हर्नमेंट सोल्युशन या संस्थेला हा कचरा गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे काम सोपविलेले आहे. या संस्थेकडून शहरात 550 कचरा संकलन केंद्राच्या माध्यमातून हा कचरा गोळा केला जातो.
हेही वाचा – शहरात पोलिसांकडून नाकाबंदी
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सांगवीतील एमएस काटे चौकातील पदपथावर जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) उघड्यावरच टाकल्याचे आढळले होते. वापरलेल्या सुया, रक्ताने माखलेला कापूस आणि उरलेल्या औषधांनी भरलेल्या काचेच्या बाटल्या त्यामध्ये आढळल्या होत्या. शहरातील विविध भागांमध्ये अशाप्रकारे उघड्यावर बायोमेडिकल वेस्ट टाकल्याच्या घटना यापूर्वीही उजेडात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांची तपासणी केली जात आहे का, याबाबत महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, नर्सिंग होम अॅक्टनुसार शहरातील रुग्णालयांची तपासणी सुरू केली आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. अद्याप रुग्णालयांना नोटिसा बजावलेल्या नाही.
नियमांचे पालन न करणार्या रुग्णालयांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. वाढीव कालावधीनंतर सुधारात्मक कृती पडताळण्यासाठी पुन्हा तपासणी केली जाईल. दुसर्या तपासणीनंतरही निर्धारित मानकांची पूर्तता न करणार्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.