स्वच्छ, मुबलक पाण्यासाठी महापालिका देणार प्राधान्य; नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणार

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील विकासाचा वेग आणि भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता, शहरातील नागरिकांना स्वच्छ, व मुबलक पाणी देण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. विकसनशील भागातील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी आणि पाण्याची वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी पाण्याचे प्रलंबित प्रकल्प पुर्ण केले जाणार आहेत. स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्याला प्राधान्य दिले असून, पवना धरण ते निगडीपर्यंत बंदिस्त जलवाहिनीसाठी ९५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कामही सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शहराचा पाणी पुरवठा सक्षमीकरणावर भर दिला आहेत. त्यानूसार पवना धरणापासून निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनी टाकण्यात येणार आहेत. शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेवर उपकरणे आणि आटोमेशन, पाणी पुरवठा यंत्रणेवर स्वयंचलित नियंत्रण आणि निरीक्षण करण्यासाठी सध्याचा स्काडा प्रणालीसह रिमोट कंट्रोल करण्यात येणार आहे. याकरिता प्रकल्प राबवला जाणार आहे. तसेच नवीन पाण्याच्या टाक्या व मुख्य जलवाहिनी प्रकल्पात पाण्याच्या ३१ टाक्या बांधून ८३.५ एमएलडी साठवण क्षमता केली जाईल.
पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पवना धरणातून नदीद्वारे पाणी सोडल्यानंतर ते रावेत बंधा-यातून उचलले जाते. धरणातून पालिका पाणी पुरवठा विभाग दररोज ५१० ते ५३० एमएलडी पाणी शहरासाठी घेण्यात येते. मात्र, शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत सुमारे ३० लाखांच्या घरात असून हे पाणी शहराला दिवसाआड पुरेसे प्रमाणात द्यावे लागत आहे
शहराची जीवनवाहिनी असलेली पवना नदी अतिप्रदूषित झाली आहे. नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. पवना धरणापासून ते रावेत बंधारा येथील पाणी उपसा केंद्रापर्यंत विविध कंपन्याचे रासायनिक व केमिकलयुक्त पाणी, विविध सोसायटीचे मैलामिश्रित व सांडपाणी, रसायनयुक्त पाणी हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी आलेल्या पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. याशिवाय मृत जनावरे, जलपर्णी, वेगवेगळा कचरा देखील त्या बंधाऱ्यात आढळून येत आहे. अशा प्रकारे विविध रासायनिक व केमिकल्सयुक्त असलेले सर्वाधिक प्रदूषित पाणी हे रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा केंद्रातून उचलून ते निगडीच्या जलशुध्दीकरण केंद्रात आणून त्यावर किलो क्लोरिन गॅस आणि ब्लिचिंग पावडरचा मारा करुन ते पाणी पिण्यायोग्य बनवले जात आहे. मात्र, ते पाणी पिण्यायोग्य असले तरीही त्यात काही प्रमाणात प्रदूषणाचे घटक राहिले जात आहेत.
हेही वाचा – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा शुध्द व मुबलक पाण्यासाठी पवना धरणापासून ते निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनी टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. पवना धरणातून बंद जलवाहिनीने पाणी पुरवठा करण्यासाठी ९५० कोटी स्वतंत्र तरतूद केली आहे. या प्रकल्पामुळे शहराला शुध्द पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तर पाणी पुरवठ्याचा यंत्रणेवर स्वयंचलित नियंत्रण व निरीक्षण करण्यास स्काडा प्रणालीतून रिमोट कंट्रोल करण्यासाठी ३६.७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी २७११ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार असून, यावर्षीच्या आर्थिक अंदाजपत्रकात इंद्रायणी नदीसाठी ११२.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहेत. मुळा नदीसाठी पहिल्या टप्प्यातील वाकड ते सांगवी फाट्यापर्यंतच्या कामाला सुरुवात झाली आहे. पवना नदीसाठी राज्य आपत्ती निवारण निधीअंतर्गत राज्य सरकारकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या अमृत २.० सरोवर योजनेअंतर्गत इंद्रायणीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
महापालिकेच्या वतीने निगडी ते दापोडीपर्यंत एक हजार मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यासाठी ५७.८१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या अनधिकृत नळजोडण्या ओळखणे आणि प्रत्येक घराला मीटर जोडणे तसेच पाणीगळती रोखण्यासाठी ४६.९८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पम्पिंगचा दाब वाढवणे व विजेची बचत करण्यासाठी दुर्गादेवी टेकडीवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी १२७ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला भामा-आसखेड धरणातून प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर पाण्याचा आरक्षण कोटा मंजूर केला आहे. याचा वापर करण्यासाठी एकूण ३६०.५५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवीन ३१ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी २७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत नळजोडण्या ओळखून त्या प्रत्येक घराला स्मार्ट मीटरने पाणी जोडण्यात येणार आहे. याकरिता पाणी पुरवठा विभागाने ४६.९८ कोटींची तरतूद केली आहे. यामुळे जून्या अनधिकृत नळ जोडण्यामधून होणारी पाण्याची गळती कमी करण्यास मदत होईल. तसेच पाणी पट्टी महसूलात वाढ आणि थकीत पाणी कराची अपेक्षित वसूल होण्यास मदत होणार आहे. तर दुर्गादी टेकडीवर पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. यास १२७ कोटी तरतूद केली आहे. यामुळे स्थानिक पंपिंग कमी करणे, पाण्याचा दाब वाढवणे, विजेची बचत होण्यास मदत होईल.
–शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका