प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर

पुणे: देशात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत (पीएमएफएमई) 22 हजार 10 प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, देशात महाराष्ट्र अन्न प्रक्रिया उद्योगात अव्वल स्थान पटकावले आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे 2 हजार 263 कोटींची गुंतवणूक झाली असून, लाभार्थ्यांना सुमारे 389 कोटींचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती पीएमएफएमई प्रकल्पाचे राज्याचे नोडल अधिकारी आणि राज्याचे कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी दिली.
पीएमएफएमई योजनेत 2021 पासून अंमलबजावणी सुरू झाली. त्यामध्ये चालू वर्ष 2024-25 मध्यने नव्याने 6 हजार 500 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण मंजूर प्रकल्पांपैकी 15 हजार प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, अहिल्यानगर द्वितीय क्रमांकावर आणि सांगली जिल्हा तिसर्या क्रमांकावर आहे. वैयक्तिक, गट लाभार्थी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाख, सामाईक पायाभूत सुविधा, मूल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.
हेही वाचा – ‘केईएम’ ची आरोग्य यंत्रणा ‘‘मृत्युचा सापळा’’
या योजनेत सहभागी होणार्या अर्जदाराला वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थी व सामाईक पायाभूत सुविधा या घटकांसाठी www. pmfme.mofpi.gov.in वर अर्ज सादर करावा लागणार आहे. बीज भांडवलाचा लाभ घेऊ इच्छिणार्या ग्रामीण आणि शहरी लाभार्थ्यांनी विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यासह नजीकची कृषी कार्यालये, बँकांशी संपर्क साधावे, असे आवाहनही आवटे यांनी केले.
सर्वाधिक तृणधान्यांच्या प्रकल्पांना मंजुरी
राज्यात या योजनेंतर्गत मंजुरी मिळालेल्या पीकनिहाय उत्पादनांतील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक प्रकल्प तृणधान्ये, मसाले, भाजीपाला, कडधान्यांचे आहेत. तृणधान्ये उत्पादने 4369, मसाले 3522, भाजीपाला 3242, कडधान्ये 2723, फळ 2160, दुग्ध 2099, तेलबिया 830, पशुखाद्य 553, तृणधान्ये 523, ऊस 446, मांस उत्पादने 120, वन 98, लोणचे 41, सागरी उत्पादने 39 व इतर एक हजाराहून अधिक प्रकल्पांचा समावेश आहे.
मंजूर प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगर पहिल्या क्रमांकावर
छत्रपती संभाजीनगर 1895, अहिल्यानगर 1329, सांगली 1235, नाशिक 1154, पुणे 1108, सातारा 937, जळगाव 933, सोलापूर 927, बुलडाणा 919, कोल्हापूर 894, वर्धा 782, अमरावती 759, यवतमाळ 742, नागपूर 695, चंद्रपूर 674, गोंदिया 634, जालना 539, धुळे 525, नंदुरबार 493, सिंधुदुर्ग 481, वाशिम 421, धाराशिव 417, अकोला 398, रत्नागिरी 367, लातूर 342, भंडारा 341, ठाणे 323, नांदेड 310, पालघर 286, परभणी 278, गडचिरोली 273, रायगड 245, हिंगोली 179, बीड 127, मुंबई उपनगर 43, मुंबई 5. एकूण 22 हजार 10.