पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मोनिका ठाकुर!
जांभळे पाटील यांच्या बदलीचा आदेश येण्यापूर्वीच ठाकूर यांची नियुक्ती; प्रशासनात संभ्रम

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांचा तीन वर्षांचा नुकताच कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र, त्यांच्या बदलीचा अद्याप कोणताही आदेश शासनाकडून आला नाही. तत्पूर्वीच मोनिका ठाकुर यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी जारी केला आहे. जांभळे-पाटील यांची बदली झाली नसताना ठाकुर यांचा आदेश आल्यामुळे प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नुकतीच पालिका आयुक्त शेखर सिंह यांची कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्ती झाली. शेखर सिंह यांनी तीन वर्ष दोन महिने पालिकेचा कारभार पाहिला. तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणार हे निश्चित झाले होते त्याप्रमाणे त्यांची बदली झाली. दरम्यान जांभळे पाटील यांचीही कारभाराची तीन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार याची चर्चा रंगली आहे. असे असताना मोनिका ठाकूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे मात्र त्यांची नियुक्ती कोणाच्या जागी झाले हे स्पष्ट नाही. जांभळे पाटील यांच्या बदली आदेश येण्यापूर्वी ठाकूर यांची नियुक्ती झाल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा मोठा निर्णय ; बॉक्साईट आरक्षणातून ११ गावांची सुटका होणार
सहायक आयुक्त शिंदे यांची बदली
महापालिका निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची पदोन्नतीने नागपूर येथे अपर जिल्हाधिकारी या पदावर सोमवारी (दि. २०) बदली झाली. त्यांच्याकडे नागपूर विभागातील प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी जारी केला आहे.शिंदे यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग आणि निवडणूक विभाग या दोन्ही महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी होती. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. तसेच मतदार याद्यांचे कामकाज देखील त्यांनी सुरू केले होते. अशातच त्यांची पदोन्नतीने बदली झाल्यामुळे निवडणूक विभागाचे कामकाज कोणाकडे दिले जाणार, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.




