‘गेल्या १९ दिवसांत १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांचा विशेष रेल्वेगाड्यांमधून प्रवास’; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली : रेल्वे, माहिती आणि प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाच्या वॉर रूमला भेट दिली. या भेटीत त्यांनी या सणाच्या हंगामातील प्रवाशांशी संबंधित घडामोडींचा आढावा घेतला. संपूर्ण आठवडा, दिवसाचे चोवीस तास काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले तसेच, दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छाही दिल्या.
देशभरात गेल्या १९ दिवसांत १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी विविध विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास केल्याची माहिती यावेळी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, “सणासुदीच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाने विविध विभागांमधून विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात सर्वात जास्त म्हणजे १ हजार ९९८ मध्य रेल्वेकडून, त्याखालोखाल १ हजार ९१९ उत्तर रेल्वेकडून तर दीड हजार गाड्या पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आल्या होत्या. या सर्व प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी १२ लाख रेल्वे कर्मचारी अव्याहत काम करत असल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
हेही वाचा – पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मोनिका ठाकुर!
पुढे रेल्वे मंत्रालयानं म्हटले आहे की, दिवाळी आणि छठच्या उत्सवादरम्यान प्रवासात अडचण येऊ नये यासाठी, यंदा भारतीय रेल्वे 12,011 विशेष गाड्या चालवत आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत 7,724 गाड्या चालवल्या गेल्या होत्या. सणाच्या निमित्ताने प्रवाशांची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने १ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान नियमित गाड्यांव्यतिरिक्त ३९६० विशेष गाड्या यशस्वीरित्या चालवल्या आहेत. तसेचे भारतातील रेल्वेने दिवाळी आणि छठ सणानिमित्त प्रवाशांची वाढीव संख्या लक्षात घेत येत्या काही दिवसांत सुमारे 8,000 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे.
नवी दिल्ली परिसरातील नवी दिल्ली, दिल्ली, आनंद विहार, हजरत निजामुद्दीन आणि शकूर बस्ती स्थानकांवरून १६ ते १९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान एकूण १५.१७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या १३.६६ लाख प्रवाशांच्या तुलनेत ही संख्या १.५१ लाखांनी अधिक आहे.
यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्ली आणि आनंद विहार रेल्वे स्थानकांना भेट देऊन प्रवाशांशी संवाद साधला आणि रेल्वेकडून करण्यात आलेल्या व्यवस्थांबाबत अभिप्राय घेतला.



