‘‘शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा लढवय्या शिलेदार’’ : तुषार कामठे
मिशन- PCMC : महापालिका पिंपळे निलख प्रभागातून ‘‘तुतारीचा निनाद’’

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील निष्ठावान आणि संघटनात्मक ताकद म्हणून ओळखले जाणारे तुषार कामठे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत ते पिंपळे निलख प्रभाग क्रमांक २६ मधून उमेदवार म्हणून मैदानात असून, भाजपा व प्रस्थापित राजकारणाविरोधात थेट लढत देत आहेत.
पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत तुषार कामठे यांनी पक्षाची धुरा खंबीरपणे सांभाळली. बदललेल्या पक्षचिन्हासह अल्प वेळेत संघटन उभे करणे, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवणे, हे त्यांनी प्रभावीपणे साध्य केले. लोकसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती.
हेही वाचा – विकासाच्या मुद्यांवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचा प्रचाराचा धडाका!
नगरसेवक म्हणून केलेल्या कार्यकाळात त्यांनी मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक विकासाला प्राधान्य दिले. केवळ राजकारण न करता नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकास हीच त्यांची ओळख राहिली आहे. कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि युवकांमध्ये त्यांचा थेट संपर्क असल्याने प्रभागात त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर परिसर, अण्णाभाऊ साठे नगर, वेलुनगर बाग, रक्षक सोसायटी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये विकास, पारदर्शक कारभार आणि लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन देत तुषार कामठे यांनी प्रचाराला गती दिली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“महापालिका निवडणूक माझ्यासाठी केवळ सत्ता किंवा पदाची नाही, तर विश्वासाची आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नासाठी मी कायम रस्त्यावर उतरणार आहे. पारदर्शक कारभार, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्याची जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन.”
– तुषार कामठे, उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष. प्रभाग क्रमांक-26, पिंपळे निलख.





