आमदार महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे ‘ट्रेनिंग कॅम्प 2025’ उत्साहात पार!
फाउंडेशनच्या 11 विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवत घवघवीत यश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे या वर्षीही आमदार महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आयोजित ‘ट्रेनिंग कॅम्प 2025’ उत्साहपूर्ण वातावरणात आणि उत्तम प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला. हा कॅम्प २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आला. कॅम्पदरम्यान दरवर्षीप्रमाणेच ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आली असून, यावर्षी एकूण अकरा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन अभिमानास्पद यश संपादन केले आहे.
या यशस्वी समारोपानिमित्त आयोजित ब्लॅक बेल्ट वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गणेश लांडगे, उपाध्यक्ष संदीप जाधव, कार्याध्यक्ष अमोल जगताप, तसेच परशुराम नवलेकर, दीपक ठाकूर, राहुल माने, विकी बोडखे, कुणाल पाटेकर यांसह संस्थेचे सर्व ब्लॅक बेल्ट सदस्य उपस्थित होते.

समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ANT इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अशोक थोरवे, पिंपरी-चिंचवड किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बोईनवाड सर, तसेच फ्युचर वेव्ह स्कूलचे ट्रस्टी दत्तात्रय वाळके, सचिन आंबेकर सर आणि रवींद्र लबडे सर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या यशाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
हेही वाचा : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर; महत्वाच्या तारखा पहा…

फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, अशा प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून समाजात शिस्त, आत्मविश्वास आणि क्रीडाभाव वाढीस लागतो. या शिबिरांतून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्तीचा विकास होत असल्याचेही मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी:
प्रज्वली पाटील, प्रेरणा हाके, वेदिका गवळी, जयवर्धन सूर्यवंशी, शंतनु पवार, श्रीअंश शिंदे, नव्या बागुल, उत्कर्ष उबाळे, सोहम साधू आणि दूर्वा लांडगे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि ब्लॅक बेल्ट देऊन गौरविण्यात आले. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

“महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या परिसरातील खेळाडूंनी मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रत्येक खेळाडू हे आपल्या समाजाचे अभिमानस्थान आहे. आगामी काळात या प्रतिभावान तरुणांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी फाउंडेशनकडून सर्वतोपरी मदत आणि प्रोत्साहन दिले जाईल.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




