‘संमती दिल्यास प्रत्येक मंदिरासाठी १ कोटी निधी देईन’; आमदार सुनील शेळके
तळेगाव दाभाडे : तळेगावचा ऐतिहासिक वारसा आणि वसा जतन करण्यासाठी सरसेनापती उमाबाई दाभाडे घराण्यातील वंशजांनी त्यांच्या मालकीची मंदिरे, यात पाचपांडव मंदिर, बनेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, राजघराण्याची समाधीस्थळे आदी ठिकाणी मंदिर बांधणी व सुधारणा करण्यासाठी संमती दिल्यास प्रत्येक मंदिरासाठी १ कोटीचा निधी उपलब्ध करून देईन, असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार यांच्या २७१ व्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली वाहताना आमदार शेळके बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, श्रीमंत संध्याराजे दाभाडे, श्रीमंत वृषालीराजे दाभाडे, श्रीमंत दिव्यलेखाराजे दाभाडे, दीपक दाभाडे, आनंद दाभाडे, रुपाली दाभाडे, शोभा भेगडे, बजरंग जाधव, सुबोध दाभाडे, अर्चना दाभाडे उपस्थित होते.
हेही वाचा – मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित? आज मुंबईत बैठका, राजकीय घडामोडींना वेग
सरसेनापती दाभाडे घराण्याने तळेगावमध्ये जे योगदान दिले, त्याची जपवणूक करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत आमदार शेळके यांनी व्यक्त केले. यावेळी हभप माऊली दाभाडे यांनी इतिहासाचा आढावा व्यक्त केला. सूत्रसंचलन अॅड विनय दाभाडे यांनी केले. तर आभार तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे यांनी केले.