पश्चिम बंगालमध्ये राजकीय खळबळ! सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या झाडून हत्या

West Bengal | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय तिढा सुरू असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रकांत रथ यांची माध्यमग्राम येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात रथ यांचे सहकारी बुद्धदेब हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत रथ हे स्वतः गाडी चालवत बरसात येथील आपल्या घरी परतत होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या संशयितांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. माध्यमग्राम परिसरात गाडीचा वेग कमी होताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यापैकी तीन गोळ्या रथ यांना लागल्या. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने डायव्हिर्सिटी नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा
इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार
चंद्रकांत रथ हे सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर ते अधिकारी यांच्यासोबत राजकीय समन्वयक म्हणून काम पाहत होते. निवडणूक रणनीती आणि राजकीय डावपेच आखण्यात त्यांचा मोठा वाटा होता. हल्ला झाला तेव्हा सुवेंदू अधिकारी त्यांच्यासोबत नव्हते.
या घटनेनंतर भाजप आक्रमक झाली असून नेते दिब्येंदू अधिकारी यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप नेते निखील प्रसून यांनी या हत्येला तृणमूल काँग्रेसची ‘हिंसक संस्कृती’ जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या हत्येमागे मोठा राजकीय कट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी भांबिनापूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा १५,००० मतांनी पराभव केला असून ते मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या निकटवर्तीयाची हत्या झाल्याने राज्यात तणावाचे वातावरण आहे. पोलीस सध्या प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.





