एकनाथ शिंदे की अजितदादा? नव्या सरकारमध्ये कोण वरचढ?, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय?
मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासूनच राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी सुरु आहेत. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतंच दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीतील केंद्रीय नेतृत्व अमित शाह, जे.पी.नड्डा यांच्या महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत होते. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल, कोणाला किती मंत्रिपद मिळणार याबद्दलही चर्चा करण्यात आली.
काल रात्री (२८ नोव्हेंबर) दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रिपदाची मागणी केली आहे. पण महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार देण्यात आला आहे. त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच भाजपकडून अनेक महत्त्वाची खातीही शिंदेंना दिली जाणार असल्याचे बोललं जात आहे.
महायुतीकडून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यानुसार 21-12-10 अशा पद्धतीने मंत्रिपदांची विभागणी केली जाऊ शकते, असे बोललं जात आहे. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे मिळू शकतात. त्यापाठोपाठ शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदे आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रीपदे मिळू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण अद्याप यावर कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.
हेही वाचा – ‘एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं काम आता झालय’; संजय राऊत
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. त्यासोबतच नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदेंच्या पारड्यात पडणार आहेत. तर दुसरीकडे भाजप स्वत:कडे मुख्यमंत्रीपदासह गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृह निर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, सामान्य प्रशासन ही खाती ठेवणार आहे.
तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, महिला आणि बालविकास, अल्प संख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती दिली जाणार आहेत. यामुळे महायुती सरकारमध्ये गेल्यावेळेप्रमाणे आताही दोन उपमुख्यमंत्री असू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान सध्या मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित असणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपदावर चर्चा होणार आहे. तसेच अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल.