‘महिलांना हक्काचा व्यवसाय देणार’; अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

पिंपरी : सक्षमा प्रकल्पाअंतर्गत शहरातील सक्रीय महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येत आहे. यासह त्यांना मालमत्ता कर संकलन, नवी दिशा, अग्नि सुरक्षा सर्वेक्षण यांसारख्या महापालिकेच्या विविध उपक्रमात सहभागी करून घेत रोजगार उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे.
तसेच बचत गट, मॉल यांसारख्या संकल्पना राबवून त्यांना कायमस्वरूपी स्वत:चा हक्काचा व्यवसाय सुरू करून देणे हा यामागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
हेही वाचा – पोलीस दलात लवकरच मोठे बदल?; आयुक्तालयाने सादर केला शासनाला प्रस्ताव
पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी सक्षमा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात सहभागी महिला बचत गटांसाठी महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी कॉलनी येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाजवळील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, उषा मुंडे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, प्रशासन अधिकारी पुजा दूधनाळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी, टाटा मोटर्स गृहिणी प्रकल्प अध्यक्षा शिल्पा देसाई, सीएसआर प्रमुख अमिता जाधव, सल्लागार अनिता राजन आदी उपस्थित होते.