Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बर्न वॉर्ड नसल्याने भाजलेल्या रुग्णांची हेळसांड

पिंपरी : महापालिका रुग्णालयांमध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) नसल्याने भाजलेल्या रुग्णांची हेळसांड होते. महापालिकेच्या वतीने चिंचवडगाव येथील जुन्या तालेरा रुग्णालयात उभारण्यात येत असलेला एकूण 30 खाटांचा बर्न वॉर्ड नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरही सुरू होऊ शकलेला नाही.

महापालिकेकडून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (संत तुकारामनगर-पिंपरी), थेरगाव रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय, चिंचवड), भोसरी रुग्णालय, सांगवी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, जिजामाता रुग्णालय (पिंपरी) आदी रुग्णालये चालविण्यात येतात.

सध्या यातील एकाही रुग्णालयात बर्न वॉर्ड अथवा जळीत कक्ष कार्यान्वित नाही. त्यामुळे, रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालय गाठावे लागत आहे. अथवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. एखाद्या दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीला 15 मिनिटांच्या आत उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे, महापालिका रुग्णालयांमध्ये किमान एक तरी जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) असणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही वाचा     –      पुणे बुद्धिमान लोकांचं शहर; मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

वर्षभरापूर्वी 8 डिसेंबर 2023 रोजी तळवडेतील स्पार्कल फायर कॅन्डल बनवण्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 14 कामगारांचा मृत्यू झाला होता. या आगीमध्ये भाजलेल्यांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नसल्याने गंभीर जखमी महिलांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागले होते. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ‘बर्न वॉर्ड’ उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी महापालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांची तरतूदही केली. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही हा बर्न वॉर्ड प्रत्यक्ष सुरू होऊ शकलेला नाही.

जुन्या तालेरा रुग्णालयात नियोजित असलेला जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) पूर्ण क्षमतेचे कार्यरत होण्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. जुन्या तालेरा रुग्णालयाचे स्थलांतर नवीन तालेरा रुग्णालयात झाल्यानंतरच या ठिकाणी बर्न वॉर्डचे काम करता येणार आहे. त्यामुळे बर्न वॉर्डसाठी चिंचवडमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या तालेरा रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन ते सुरू होण्याची वाट पहावी लागणार आहे. ही प्रतीक्षा आणखी किती दिवस करायची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button