देहूनगरीत आज रंगणार बीज सोहळा! उपमुख्यमंत्र्यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्काराने गौरव
बीजोत्सव त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याची रविवारी सांगता

देहू | संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा बीजोत्सव त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता आणि ३७६वा बीज सोहळा हरिनामाच्या गजरात येत्या रविवारी (१६ रोजी) देहूत साजरा होत आहे. यानिमित्त राज्यभरातून वारकरी, भाविक, फडकरी आणि संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील मान्यवर या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त मानक महाराज मोरे, संजय महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवार (१६ रोजी) बीज सोहळादिनी श्रीक्षेत्र देहूत विविध धार्मिक कार्यक्रम प्रथा-परंपरांचे पालन करीत होणार आहेत. यामध्ये पहाटे तीन वाजता काकडा, पहाटे चार वाजता देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते ‘श्रीं’ची पूजा, शिळामंदिर महापूजा वंशज (देहू) व वारकरी यांच्या हस्ते होईल. पहाटे सहा वाजता वैकुंठगमनस्थान येथे पूजा, सकाळी साडेदहा वाजता ‘श्रीं’ची पालखी वैकुंठगमनस्थानाकडे हरिनामाच्या गजरात मार्गस्थ होईल. पहाटे मंदिरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणीमाता यांची अभिषेक पूजा होणार आहे. त्यानंतर ‘श्रीं’ची पालखी मुख्य मंदिरातून सदेह वैकुंठगमनस्थानी हरिनामाच्या गजरात निघेल. सकाळी १० ते १२ या वेळेत बीज सोहळा होत आहे. यात ह.भ.प. महाराज मोरे देहूकर यांचे बीज सोहळ्यावर आधारित कीर्तन होईल.
हेही वाचा : विधायक: समतेचा संदेश देणाऱ्या शिवविवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा
उपमुख्यमंत्र्यांचा होणार गौरव!
संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने दर पंचवीस वर्षांनी वारकरी संप्रदायात योगदान देणाऱ्या समाजातील व्यक्तींचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यंदा संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याची ३७५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. रविवारी (ता. १६) बीज सोहळ्यापूर्वी सकाळी साडेन वाजता वैकुंठगमनस्थान येथील मंदिरासमोरील मंडपात हा पुरस्कार संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने देण्यात येणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, टाळ, चिपळ्या, विणा, गाथा आणि संत तुकाराम महाराजांची पगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
भाविकांसाठी सोयीसुविधा..
नगरपंचायत कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष उभारले आहे. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक, तसेच स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, पाण्याचे टँकर आदी विषयांची माहिती असलेले क्यूआर कोडसह स्थानदर्शक नकाशाही उभारण्यात आला आहे. स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत, १२ वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे टँकर भक्तनिवास येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण तपासणी शेजारी हिरकणी कक्ष आहे. गावठाण परिसर स्वच्छता सुरू असून इंद्रायणी नदीघाट, मुख्य मंदिर परिसर व रिंगरोड परिसर स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आहे.