थकबाकी वसूलीसाठी महिला पथकांची नेमणूक

पुणे : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी आता कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचीही नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी ६० महिला कर्मचाऱ्यांची १४ पथके वसुलीसाठी नेमण्यात आली आहेत. महिला दिनाचे औचित्य साधत या महिलांवर ही वसूलीची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या करसंकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
महापालिकेच्या मिळकतकर विभागास २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २८०० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मात्र, या विभागास मार्च महिना अर्धा झाला असला तरी आतापर्यंत केवळ २१५० कोटी पर्यंतच मजल मारता आली असून पुढील १५ दिवसांत जवळपास साडेसहाशे कोटींची वसूली करायची आहे. त्यासाठी पालिकेकडून थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यासह, बॅंड पथक आणि नियमित वसूली पथकांच्या माध्यमातून कर वसूल केला जात आहे.
हेही वाचा – देहूनगरीत आज रंगणार बीज सोहळा! उपमुख्यमंत्र्यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्काराने गौरव
त्यात, आता महिला कर्मचाऱ्यांवरही थकबाकी वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व महिलांकडे कर संकलन विभागाच्या कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी आहे.थकबाकी वसुलीवेळी अनेकदा मिळकतधारकांसोबत वाद होतात त्यामुळे वसुलीसाठी सुरक्षा रक्षकांसह पुरूष कर्मचाऱ्यांची पथके नेमली जातात. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच महिलांनाही ही वसूलीची संधी देण्यात आली आहे.