breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी केली विसर्जन घाटांची पाहणी

पिंपरी : लहान गणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन हौदांमध्येच करावे तसेच शाडू मातीच्या बाप्पाचे विसर्जन घरीच स्वच्छ पाण्यात करावे जेणेकरून शहरातील वातावरण पर्यावरणपूरक राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विसर्जन घाटांवर पुरेसे कर्मचारी आणि यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, निर्माल्य कुंडाची व्यवस्था करणे, कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता आणि डागडुजी करणे अशा विविध सुचनाही आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज शहरातील सर्व प्रमुख गणेश विसर्जन घाटांची तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.

या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, उप आयुक्त रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, शिवराज वाडकर, हरविंदरसिंह बंसल, विजयसिंह भोसले, अनुश्री कुंभार, जहिरा मोमीन, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा    –      राजकारणात जाणार का? गौतमी पाटीलने दिलं भन्नाट उत्तर

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी घाटांवर येत असतात. मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पिंपरी चिंचवड शहरात साजरा केला जात असल्याने यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनसाठी घाटावर येण्याची शक्यता आहे. शिवाय गणपतीची प्रतिष्ठापना आणि विसर्जनासाठी शहरातून निघणाऱ्या मिरवणुकांच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व विसर्जन घाटांवर भाविकांसाठी सुरक्षा, आरोग्य, आपत्तीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केलेल्या प्रमुख स्थळांमध्ये रावेत येथील जाधव विसर्जन घाट, थेरगाव चिंचवड पूल विसर्जन घाट, चिंचवड येथील सुभाष घाट, मोशी येथील इंद्रायणी नदी विसर्जन घाट, मोशी खाण या स्थळांचा समावेश होता.

या ठिकाणांची पाहणी करत असताना आयुक्त शेखर सिंह यांनी विसर्जन घाटांवर सुशोभीकरण करण्यात यावे तसेच दिशादर्शक व स्थळदर्शक फलक लावण्यात यावे, विसर्जन घाटांवरील निर्माल्यकुंडांची ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी फलक लावावेत, अनुचित प्रकार घडू नये यासाठी घाटांवर जीवनरक्षकांची नेमणूक करून मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय साधावा, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा सूचना संबंधित विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button