गुन्हेगारांच्या बेकायदा घरावर बुलडोझर
पुणे : गुन्हेगारांनी आपली घरे जर बेकायदा पद्धतीने उभारली असतील, तर त्यावर आता बुलडोझर चालणार आहे. पोलिसांनी याबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.नियमांच्या चौकटीत राहून महापालिकेच्या मदतीने हे काम करण्यात येणार आहे, असा इशाराच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि टोळ्यातील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.वनराज यांच्या खुनात सहभागी असलेल्या प्रमुख आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी या गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या बेकायदा घरावर बुलडोझर फिरविण्याची तयारी केली आहे.
हेही वाचा – मंद तारकांनी मैत्री कट्ट्याचे तारांगण फुलवले
पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या बेकायदा घरांची, मालमत्तेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये काही आरोपी फ्लॅटमध्ये राहात आहेत, तर काही आरोपींची घरे भाड्याची आहेत.त्यांच्या घरांची मालकी तपासली जात असून, त्यामध्ये जर ही घरे सरकारी जागेवर अतिक्रमण करून उभारली असतील, कोणाच्या मालमत्तेत अवैध ताबा मारून बांधली असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
आतापर्यंत आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी एकूण १५ जणांना अटक केली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आणखी काही संशयित आरोपी पोलिसांच्या रडावर आहेत.