तनिषा भिसे प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मातेच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवालात रुग्णालयाच्या हलगर्जीपणाला दोषी ठरवण्यात आले असून, या प्रकरणात वरिष्ठ डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग आणि रुग्णांना होणारा त्रास पाहता डॉ. घैसास यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या उपचारात निष्काळजीपणा दाखवला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात डॉ. घैसास यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी अनामत रक्कम (डिपॉझिट) मागितल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला राजीनामा सुपूर्द केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात १० हजार रुग्णांचा मोफत डायलिसिस उपचारांचा टप्पा पूर्ण
तनिषा भिसे या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने २९ मार्च २०२५ रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तनिषा या भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. कुटुंबीयांचा आरोप आहे की, रुग्णालयाने उपचार सुरू करण्यापूर्वी १० लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबाने ३ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली, तरीही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. यामुळे तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, जिथे तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु उपचारातील विलंबामुळे तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी रुग्णालयाबाहेर आंदोलने केली, तर सोशल मीडियावरही तीव्र नाराजी व्यक्त झाली. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असून, अहवालात रुग्णालयाच्या चुकीमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. आता डॉ. घैसास यांच्या राजीनाम्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.