वैष्णवीची हत्याच, तपास एसआयटीकडे द्या; आनंद कस्पटे
२९ पैकी १५ जखमा ताजा असल्याचे शवविच्छेदन अहवालातून आले समोर

पिंपरी | वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी हा खून असल्याचे म्हटले आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असे माझे म्हणणे आहे, असे सांगत वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी याप्रकरणी कसून चौकशी होण्याची मागणी केली आहे.
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणानंतर हगवणे कुटुंबियांना अटक करण्यात आली. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, त्याबाबत माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील कस्पटे म्हणाले, ’’शवविच्छेदन अहवालानुसार वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा होत्या. यातील १५ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या होत्या. त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण करण्यात आली होती. यावरून ही आत्महत्या नसून हत्याच आहे, असे माझे ठाम म्हणणे आहे. तसेच उर्वरीत वळ व जखमा जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात वैष्णवीला सतत मारहाण करून छळ करण्यात येत होता, हे त्यावरून सिद्ध होत आहे. तसेच याप्रकरणात चांगला वकील नियुक्त करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला या प्रकरणातील माहिती कळविण्यात यावी तसेच तपास एसआयटीकडे देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.’’
हेही वाचा : ..तर बाळासाहेबांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली असती; अमित शहांचा ठाकरेंना टोला