..तर बाळासाहेबांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली असती; अमित शहांचा ठाकरेंना टोला

Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड येथील ‘शंखनाद’ सभेतून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटावर जोरदार टीका केली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल बोलताना त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहा म्हणाले, जर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली असती. पण माहीत नाही, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाला काय झाले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर परदेशात पाठविलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला ‘वरात’ म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
अमित शाह म्हणाले, की संपूर्ण जगाला भारताने संदेश दिला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला उत्तर देण्यासाठी २२ मिनिटांत हवाई दलाने नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. त्यांनी पाठविलेले ड्रोन, क्षेपणास्त्रे हवेतच विरली. केवळ एवढेच नाही तर पंतप्रधानांनी रक्त सांडणाऱ्यांना पाणी मिळणार नाही, असे सुनावत नेहरूंनी केलेला ‘सिंधू जलकरार’ थांबवला, व्यापारी संबंध तोडले. यापुढे जर पाकिस्तान सुधारला नाही तर धडा शिकवू.
हेही वाचा : हगवणे कुटूंबाला मोक्का लावा; अंबादास दानवे यांची मागणी
शहा यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला ‘वरात’ संबोधल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. हा शब्दप्रयोग बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत आहे. एकेकाळी शिवसेना ही देशभक्ती आणि हिंदुत्वासाठी ओळखली जायची, पण आता त्यांच्या या वक्तव्यांमुळे त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे, असे ते म्हणाले.