लोणावळ्यात सशस्त्र दरोड्याचा थरार!
कुकरी, तलवारी, घातक शास्त्रांचा धाक दाखवत साडे अकरा लाखांचे दागिने व रोकड लंपास

चार वर्षांत चौथ्यांदा दरोडा; दरोडेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार
लोणावळा | प्रतिनिधी
लोणावळ्यातील प्रसिद्ध डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यात पुन्हा एकदा पडलेल्या सशस्त्र दरोड्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी मध्यरात्री २० ते २२ सशस्त्र दरोडेखोरांनी कुकरी, तलवारी यांसारख्या घातक हत्यारांची बंगल्यात प्रवेश करत डॉ. खंडेलवालसह चौघांना मारहाण करत जवळपास ११ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर चार वर्षांत चौथ्यांदा दरोडा पडला असुन, यापैकी दोनदा दरोडेखोरांना दरोडा टाकण्यात मोठे यश आले आहे. रात्री पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चोर पोलिसांचा खेळ सुरू असल्याचे येथील सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या समोरच व त्यांच्या गाडीसमोरच दरोडेखोरांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने पोलिसांच्या तत्परता आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी तरूण चंद्रमोहन खंडेलवाल (वय-५८, रा . वर्धमान इन्क्लेव्ह, लोणावळा) यांनी लोणावळा सर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या खोंडगेवाडी प्रधानपार्क येथील ओम श्री बंगल्यात अनोळखी २० ते २२ सशस्त्र दरोडेखोरांनी तलवार, कुकरी आदी हत्यारांनिशी बंगल्याचे लोखंडी गेट, मुख्य दरवाजाचे लोखंडी ग्रील आणि बेडरूमच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून बंगल्यामध्ये प्रवेश केला. बंगल्याचे पोर्चमध्ये झोपलेले वॉचमन अंबादास रामदास रायबोने यास कुकरीचा धाक दाखवून त्यास दांडक्याने मारून त्याचे व त्याची पत्नी वर्षा रायबोने यांचे कपड्याने हातपाय बांधले. त्यानंतर डॉ. खंडेलवाल यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडत त्यांनाही मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले व त्यांना जीवे मारण्याची धमकी देत बंगल्यातील सोन्या चांदीचे व डायमंडचे दागिने व २५ हजार रुपयांची रोकड मिळून सुमारे ११ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये दरोडेखोरांनी १.२५ लाखांचे सोन्याचे कडे, दोन अंगठ्या, सोन्याची चेन, तुलसी माळ, मंगळसूत्र, देवाचे दागिने, ५ लाखांचा डायमंड सेट आणि २५ हजारांची रोख रक्कम असा एकूण साडे अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
हेही वाचा : वैष्णवीची हत्याच, तपास एसआयटीकडे द्या; आनंद कस्पटे
डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यावर १७ जून २०२१ ला अशाच प्रकारे ११ ते १२ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत त्यावेळी अधिकृत ६७ लाखांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये ५० लाखांची रोकड व १७ लाखांचे विविध प्रकारचे दागिने चोरले होते. तर दोनदा दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.
दरोडा पडत असताना डॉक्टर खंडेलवाल यांचे पुतणे यांनी लोणावळा शहर पोलिसांना दरोड्या बाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोलीस वाहनांमधून आले होते. त्याचवेळी त्यांच्यासमोरच सर्व दरोडेखोर जात असल्याचे सीसीटीव्हीतील दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे. असे असताना देखील पोलिसांनी त्यांना पकडले नाही. सदरची घटनाही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर त्या घटनेवरून लोणावळा शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. समोर दरोडेखोर असताना देखील पोलिसांनी त्यांना का पकडले नाही, असा प्रश्न उपस्थित करत दरोडा पडला त्यावेळी ड्युटीवर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी या सर्वांचे निलंबन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत.