वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण : नामसाधर्म्यामुळे भाजपाच्या संकेत चोंधे यांची नाहक बदनामी
प्रसिद्धपत्रक काढून केला खुलासा : कोणत्याही दुष्कृत्यामध्ये मी किंवा कुटुंबाचा संबंध नाही!

पिंपरी-चिंचवड : गेल्या दोन दिवसांपासून मुळशी येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात संकेत नरेश चोंधे या व्यक्तीचे नाव समोर येत आहे. मात्र, यामुळे पिंपरी-चिंचवडमधील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे यांची बदनामी होवू लागली आहे. नामसाधर्म्यामुळे अनेकाचे फोन आणि मॅसेज येवू लागल्याने भाजपाचे संकेत चोंधे यांनी लेखी खुलासा करीत या चर्चांवर पडदा टाकला आहे.
याबाबत संकेत सुरेश चोंधे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘‘गेल्या दोन दिवसांपासून मुळशी येथील हगवणे कुटुंबाच्या विषयामध्ये संकेत नरेश चांधे या व्यक्तीचे नाव समोर येत आहे. मी संकेत सुरेश चौंधे रा. विशालनगर, पिंपळे निलख. माझा या प्रकरणाशी दुरान्वये कोणताही संबंध नाही. नावातील साधर्म्यामुळे समाजातील विविध स्तरातून मला संपर्क होत आहे. परंतु, या किंवा तत्सम असल्या कोणत्याही प्रकरणात माझा काहीही संबंध नाही.’’
‘‘मी भारतीय जनता पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी असून, मी भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा निवडणूक संयोजक अशा जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे. माझे वडील कै. सुरेश ज्ञानोबा चोंधे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकीच्या परिवहन समितीचे अध्यक्ष होते. माझी आई श्रीमती आरती सुरेश चोंधे ही 2012 ते 2022 या कालावधीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची नगरसेविका म्हणून दोन वेळा निवडून आली आहे. मी किंवा माझे कुटुंबीय अशा कोणत्याही दुष्कृत्यास थारा देत नाही. केवळ नावातील साम्यामुळे माझी नाहक बदनामी होत असून, मला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे’’, अशी खंतही संकेत सुरेश चोंधे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन दिवसात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात ‘संकेत चोंधे’ यांचे नाव समोर येत आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी असलेले राजेंद्र हगवणे यांनी फरार असताना वापरलेली ‘महिंद्रा थार’ गाडी ही ‘संकेत नरेश चोंधे’ यांच्या नावावरती आहे. तरी या प्रकरणात नाव येत असलेल्या ‘संकेत नरेश चोंधे’ यांचा विशालनगर, पिंपरी-चिंचवड येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेल्या ‘संकेत सुरेश चोंधे’ यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. ‘संकेत सुरेश चोंधे’ यांचे कुटुंब वैष्णवीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे कस्पटे कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहेत.
– अजित कुलथे, प्रदेश सचिव, भाजपा युवा मोर्चा.