मतदान जागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव उपक्रम
भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांचा सहभाग

पिंपरी चिंचवड | भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांनी क्षणातच वातावरण बदलले. अचानक सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करत एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला मतदान करण्याचा संदेश दिला.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध भागात मतदान जनजागृती साठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने भक्ती शक्ती चौक येथे मतदान जनजागृतीसाठी एक अनोखा व प्रभावी उपक्रम राबविण्यात आला.
हेही वाचा : कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम यंत्रे पिंपरीत दाखल!
उपस्थितांना देण्यात आली मतदानाची शपथ
आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.





