Ground Report : ‘घरवापसी’वरुन खासदार कोल्हे यांची ‘स्ट्राँग’ भूमिका; पिंपरी-चिंचवडमधील संभाव्य प्रवेशकर्ते भेटीला!
पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये रात्री उशीरा झाली बैठक : पिंपरी-चिंचवडमधील ‘इनकमिंग’ची होणार आता ‘स्क्रुटनी’
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी अजित पवार गटातील शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १४ नगरसेवक ‘घरवापसी’ करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, शिरुर लोकसभा मतदार संघाचे पक्षाचे ‘ब्रँड’ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या प्रकाराबाबत रोखठोक मत व्यक्त केले. किंबहुना, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली. त्यामुळे संभाव्य प्रवेश लांबणीवर पडले आहेत.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘‘ संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरूवारी पुण्यात झाले. त्यावेळी झालेल्या मुलाखतीमध्ये डॉ. कोल्हे यांनी आपली भूमिका विशद केली. मात्र, ‘‘ही माझी वैयक्तिक आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आहे. पक्षाची अधिकृत भूमिका नाही,’’ असा सावध पवित्रा घेतला.
दरम्यान, डॉ. खासदार कोल्हे यांच्या ‘स्ट्राँग’ भूमिकेनंतर गुरूवारी रात्री उशीरा पुण्यातील सर्किंट हाऊस येथे डॉ. कोल्हे यांची मनधरणी करण्यासाठी संबंधित नेत्यांची बैठक झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला पदाधिकारीच मिळणार नाहीत, असे चित्र होते. तसेच, सुरुवातीचे दोन महिने अजित पवार गटाची मोठी ‘हवा’ होती. इम्रान शेख, सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, राहुल आहेर आदी लोकांनी शरद पवार गटाला जीवंत ठेवले. त्यानंतर माजी नगरसेवक तुषार कामठे आणि सुलक्षणा शिलवंत धर यांनी विचाराच्या मुद्यांवर ‘आम्ही साहेबांसोबत’ चालू लागले. याबाबत डॉ. कोल्हे यांनी जाहीरपणे कौतूक केले.
…आम्ही लीड दिले, मग त्यांची गरज काय?
आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वाऱ्याची दिशा बघून ‘घरवापसी’ तेजीत आहे. त्यातच अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १४ नगरसेवक ‘घरवापसी’ करण्याच्या तयारीत आहेत. गव्हाणे भोसरी विधानसभा मतदार संघातील उमेदवारीचे तीव्र दावेदार आहेत. पण, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून ‘संधीसाधु’’ नेत्यांना पुन्हा सोबत घेवू नका, अशी मागणी होत आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी ‘घरवापसी’वर थेट भाष्य केले. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली. आता येणारे लोके पलिकडे होते. त्यावेळी आम्ही काबाड कष्ट करुन तुम्हाला निवडून दिले. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची संभाव्य प्रवेशामुळे अस्वस्थता आहे. मग, आता तुम्हाला संधीसाधुंची गरज काय? असा प्रश्न निष्ठावंतांना विचारण्याचा अधिकार आहे, असा दावा करीत कोल्हे यांनी खळबळ उडवून दिली होती.
‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेतोजी पालकर यांचे ‘शुद्धीकरण’ करुन पुन्हा धर्मात घेतले. ही सामाजिक क्रांती आहे. पण, नेतोजींना पुन्हा सरसेनापतीपद दिले नाही, हा वास्तविक इतिहास आहे.’’
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शरद पवार पक्ष.
तुतारीचा आवाज…ठाकरे गटाची अस्वस्थता!
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भोसरीवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला. माजी गटनेत्या सुलभा उबाळे आणि धनंजय आल्हाट यांची नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, ‘‘शिवसेना ठाकरे गट… तुतारी किंवा हाताच्या चिन्हावरील उमेदवाराचे काम करणार नाही…’’ असा आक्रमक पवित्रा निष्ठावंत शिवसैनिकांनी जाहीरपणे घेतला. उमेदवारीबाबत होणारी रस्सीखेच लक्षात घेवून डॉ. कोल्हे यांनी ‘‘आमदार हा महाविकास आघाडीचा होईल’’ अशी सावध प्रतिक्रिया दिली होती. मात्र, भोसरीतील संभाव्य प्रवेश ‘तुतारी’मध्ये होतील, अशी चर्चा आहे. मात्र, भोसरीचा मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ठाकरे गटाला सोडला, तरी विधानभेकरिता इच्छुक असलेले नेते ‘मातोश्री’च्या संपर्कात आहेत. परिणामी, तुतारीमधून मशाल पेटण्याचा आवाज येत असल्यामुळे ठाकरे गट व निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे.
भोसरीच्या जागेवर चिंचवडचे गणित…
पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या ३ विधानसभा मतदार संघांपैकी २ मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागावाटपमध्ये ‘तुतारी’ला सोडण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील एक गट भोसरी विधानसभा मतदार संघ ‘मशाल’ ला सोडला जावा. यासाठी प्रयत्नशील आहे. उर्वरित पिंपरी आणि चिंचवडवर ‘तुतारी’च्या चिन्हावर निवडणूक व्हावी, असा प्रयत्न आहे. पिंपरीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुलक्षणा शिलवंत-धर यांना कामाला लागा असे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. तसेच, खासदार अमोल कोल्हे यांचे निकटवर्ती राहुल कलाटे यांनी विधानसभा निवडणुकीची ‘तुतारी’ फुंकण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भोसरी, पिंपरी आणि चिंचवड असे तीनही मतदार संघ ‘तुतारी’ला मिळणे मुश्किल असल्यामुळे भोसरीतील संभाव्य प्रवेश लांबणीवर ठेवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.





