सहा जिल्ह्यांतून जाणार कल्याण-लातूर जनकल्याण महामार्ग

मुंबई : मुंबई – लातूर प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण – लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर एमएसआरडीसीने संरेखनाच्या कामाला सुरुवात केली आहे. संरेखनानुसार हा महामार्ग ठाणे, पुणे,अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर सहा जिल्ह्यांतून जाणार असून या जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांना महामार्ग जोडणार आहे.
एमएसआरडीसीच्या चार हजार किमी लांबीच्या रस्ते प्रकल्पात कल्याण – लातूर द्रुतगती महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र अनेक वर्षे हा महामार्ग कागदावरच होता. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गासंबंधीचे एक सादरीकरण पाहिल्यानंतर हा महामार्ग तातडीने मार्गी लावण्याची सूचना करून प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत या महामार्गाची घोषणा करून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला. या महामार्गाला जनकल्याण महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. मराठवाड्याचा, त्यातही लातूरचा विकास साधणारा हा महामार्ग असल्याने याला जनकल्याण नाव दिल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारच्या मान्यतेनंतर एमएसआरडीसीने सल्लागाराच्या माध्यमातून या महामार्गाच्या संरेखनाच्या कामाला सुरुवात केली. संरेखन पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. मात्र हा महामार्ग सहा जिल्ह्यांतून जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – महाराष्ट्रातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, वस्त्रोद्योग विभागामार्फत ‘महत्त्वपूर्ण’ शासन आदेश जारी…
कल्याण, माळशेज घाट, अहिल्यानगर, बीड, मांजरसूंबा आणि अंबेजोगाईवरून लातूर आणि पुढे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात हा महामार्ग जाणार असल्याचे ढोबळमानाने सांगितले जात होते. पण आता मात्र हा महामार्ग नेमका कसा जाणार आहे याची माहिती सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. त्यानुसार उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब,लातूर, औसा आणि निलंगा असा हा महामार्ग जाणार आहे. या संरेखनानुसार हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांतून जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र संरेखन अंतिम झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
जनकल्याण महामार्ग मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा असून धाराशीव आणि बीडमधूनच हा महामार्ग न्यावा, या जिल्ह्यांना वगळू नये यासाठी आता राजकीय नेते मैदानात उतरले आहेत. हा महामार्ग लातूर, कळंब, पारा, ईट,खर्डा,जामखेड, अहिल्यानगर आणि पुढे कल्याणपर्यंत न्यावा अशी मागणी धाराशीवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली. या मागणीनंतर बीड जिल्ह्याला वगळून जनकल्याण महामार्ग नेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले.
हा प्रकल्प बीडमधूनच नेण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. तर बीडला वगळल्यास जनतेत असंतोष निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपापल्या जिल्ह्यातून हा महामार्ग जावा यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असले तरी तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य असेल तेच संरेखन अंतिम होईल, असे एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीड आणि धाराशीव या दोन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांतून हा महामार्ग जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.





