उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; काय सुरू आणि काय बंद राहणार?

Maharashtra Band | महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीने जनतेला सामील होण्याचे आवाहन केले आहे. तसेच या बंदमुळे जनजीवन देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
काय बंद राहणार?
महाराष्ट्र बंदचा कोणकोणत्या सुविधांवर परिणाम होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्टनुसार, सार्वजनिक वाहतूक सेवा आणि काही खासगी कार्यालयांवर त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला मार्केट, दूध विक्री, भाजीपाला विक्री, किराणा सामानाची दुकानं, हॉटेल्स व इतर दुकान बंद राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ..म्हणून मला झेड प्लस सुरक्षा दिली असावी; शरद पवारांना वेगळीच शंका
काय सुरू असणार?
महाराष्ट्र बंदच्या दिवशी सर्व प्रकारच्या शासकीय आरोग्य सेवा खुल्या राहतील. या कालावधीत सर्व रुग्णालये, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा सुरू राहतील. त्याचबरोबर सरकारी बँका बंद करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत सर्व सरकारी बँका आणि सरकारी कार्यालयेही सुरू राहतील.





