पिंपरी चिंचवडसाठी ६८ नवीन पोलीस अधिकारी शहरात दाखल
शहर पोलीस दलातील ४७ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी | राज्य पोलीस दलातील १५१२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पोलीस निरीक्षक, नऊ सहायक पोलीस निरीक्षक आणि ३२ पोलीस उपनिरीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्याच्या विविध पोलीस घटकांमधून ६८ अधिकारी पिंपरी-चिंचवड शहरात आले असून त्यामध्ये १२ पोलीस निरीक्षक, २२ सहायक पोलीस निरीक्षक आणि ३४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. याबाबत राज्याचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी मंगळवारी (२७) आदेश दिले आहेत.
वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांची ठाणे शहर येथे बदली झाली. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची ठाणे येथून पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली होती. पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांची गुन्हे अन्वेषण विभाग, विश्वजित खुळे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची, देवेंद्र चव्हाण यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर आणि सुनील पिंजण यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.
हेही वाचा : राजेंद्र हगवणेच्या घरावर शेण टाकून निषेध
पोलीस निरीक्षक महेश पाटील (मुंबई शहर), दत्तात्रय चासकर (राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, मुंबई), राहुल सोनवणे (वर्धा), राजेंद्र पाटील (सिंधुदुर्ग), जगन्नाथ जानकर (नाशिक शहर), नरेंद्र ठाकरे (बुलढाणा), विजयानंद पाटील (पुणे शहर), संजय नरावाड (पुणे शहर), संजय सोळंके (यवतमाळ), दौलत जाधव (अहिल्यानगर), सुदाम पाचोरकर (एसीबी), महादेव कोळी (मुंबई शहर) यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली आहे.
शहर पोलीस दलातील नऊ सहायक पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. तर सहायक निरीक्षक रत्नमाला सावंत, श्रीराम शिंदे यांच्यासह २२ सहायक निरीक्षक शहरात आले आहेत. विविध कारणांमुळे चर्चेत असलेले पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे तसेच सोशल मीडियावरील एका गेम मध्ये करोडपती झालेले सोमनाथ झेंडे यांच्यासह ३२ उपनिरीक्षकांची बदली झाली आहे. तर ३० पोलीस उपनिरीक्षक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. यामध्ये गडचिरोली येथून १७ पोलीस उपनिरीक्षक शहरात आले आहेत.