राजेंद्र हगवणेच्या घरावर शेण टाकून निषेध
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून आंदोलन; आरोपींना फाशीची मागणी

पिंपरी | वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी राजेंद्र हगवणे याच्या मुळशीतील भुकूम गावातील घरावर शेण टाकून पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महिला शहरप्रमुख रूपाली आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती. त्यामध्ये, वैष्णवीचा पती, सासू आणि नणंदेला सर्वात अगोदर अटक करण्यात आली होती. तर, फरार असलेल्या सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांस मध्यरात्री बेड्या ठोकल्या होत्या. हगवणे पिता पुत्रांना आश्रय दिल्यामुळे आता पोलिसांनी आणखी ५ जणांना अटक केली असून कर्नाटकातील एका माजी मंत्र्यांच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा : आषाढी वारी पालखी सोहळ्यातील सेवा सुविधांचा आढावा
पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. राजेंद्र हगवणे याच्या घरावर शेण टाकून महिला आघाडीचे वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वैष्णवीच्या मृत्यू जबाबदार असलेल्या हगवणे कुटुंबीयांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड महिला शहरप्रमुख रूपाली आल्हाट यांनी केली आहे.
या आंदोलनामध्ये उपशहर संघटिका ज्योती भालके, पिपरी विधानसभा समन्वयक सुषमा शेलार, विभाग प्रमुख साधना काशिद, नंदा दातकर, करुणा भुजबळ, वंदना वाल्हेकर, तसलीम शेख, आरती साठे, दीपक भक्त, अनिता तळेकर उपस्थित होते.