एटीएम फोडताना दोन जणांना अटक
महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल; देहूरोड पोलिसांची कामगिरी

पिंपरी चिंचवड : देहूगाव येथील इंडसइंड बँकेच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने दरोडा टाकणाऱ्या हरियाणातील टोळीतील दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. घटनास्थळी कारमधून पळून गेलेले त्यांच्या टोळीतील तीन साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ही घटना मंगळवारी (दि. २७) पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली.
मुस्तफा मोबीन खान (वय ३०) आणि मुस्तकीम मोबीन खान (वय २५, दोघेही रा. पिनागव्वान, ता. पुन्हाना, जि. नुह, हरियाणा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच सिमा युसूफ खान (वय ४०), वारीस खान (वय २०) आझाद खान (वय ४५, सर्व रा. हरियाणा) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार समाधान विष्णू पटावकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : राजेंद्र हगवणेच्या घरावर शेण टाकून निषेध
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १.५० वा. दरम्यान देहू आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेच्या एटीएमजवळ एका पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद थांबलेली बीट मार्शल समाधान पटावकर व किरण पाटील यांनी दिसली. पोलीस आल्याचे पाहताच कार भरधाव वेगाने पळाली. पोलीस एटीएमकडे धावले असता, एटीएमचे शटर उचकटलेले दिसले व आतून उजेड आणि आवाज येत असल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक जोएब शेख यांना तातडीने माहिती दिली.
पोलिसांनी शटर उघडून आत प्रवेश केला असता, दोन आरोपी गॅस कटरने एटीएम तोडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांना पाहून आरोपींनी शिवीगाळ, दगडफेक केली. मात्र आलेल्या अधिकच्या पोलीस पथकाने दोघांना पकडले. त्यांच्याकडून हरियाणातील अन्य साथीदारांची माहिती समोर आली आहे. असून हे टोळी स्वरूपात गुन्हे करत असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जोएब शेख करीत आहेत.