१३८ विद्यार्थी, १२ महाविद्यालये आणि ‘कॉल ऑफ ड्युटी’चा थरार!
शिक्षण विश्व : गेमफोर्ज ई-स्पोर्ट्स क्लबचे यशस्वी आयोजन

पुणे | डिजिटल युगातील नव्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी गेमफोर्ज ई-स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित ‘इन्फिनिक्स कॅम्पस कनेक्ट’ (Infinix Campus Connect) हा उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत शहरातील १२ नामांकित महाविद्यालयांतील १३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या गेमिंग कौशल्याचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘कॉल ऑफ ड्युटी’ (Mobile) ही स्पर्धा होती. तब्बल १५ हजार रुपयांचे बक्षीस आणि आकर्षक भेटवस्तू (Goodies) जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. या प्रसंगी ‘फ्री फायर’चे प्रसिद्ध कास्टर आणि हायड्रा ई-स्पोर्ट्सचे ऑपरेशन्स लीड वेद भाकडे तसेच लोकप्रिय कंटेंट क्रिएटर जय भांगर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ई-स्पोर्ट्स क्षेत्रातील करियर आणि संधींबाबत त्यांनी दिलेले सल्ले विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
हेही वाचा : वाकड-म्हातोबानगर परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ बी बी वाफारे,’डीन-स्टुडंट अफेयर्स’ डॉ. सुनील महाजन आणि प्रा. जयवंत भूमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी प्रतिनिधी मधुर घाटे (अध्यक्ष) आणि शिवम सामंत (उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. गेमिंगसोबतच नेटवर्किंग आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म ठरल्याची भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.





