भोसरी-बोऱ्हाडेवाडी परिसरात दहशतवादविरोधी पथकाची कारवाई
एक संशयित ताब्यात: संशयास्पद हालचालींमुळे पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये छापे

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी बोऱ्हाडेवाडी परिसरातून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दानिश सय्यद असे या संशयिताचे नाव असल्याचे समोर आले आहे. मात्र, तपासात असे दिसून आले की, तो ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता त्या भाडेकरारावर त्याने आपले नाव ‘हुसेन अब्दुला’ असे नमूद केले होते.
हेही वाचा – RBI चा धक्कादायक निर्णय, बड्या बँकेचा थेट परवानाच रद्द, ठेवीदारांमध्ये खळबळ!
सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले की, तो काही महिन्यांपूर्वीच येथे राहायला आला होता आणि फारसे कोणाशी संपर्क ठेवत नव्हता. त्याच्या वर्तनात संशयास्पद हालचाली दिसल्याने काही रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली होती, अशीही चर्चा परिसरात आहे.
एटीएस पथकाने गुरुवारी सकाळी अचानक छापा टाकून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर फ्लॅटची तपासणी करून काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे (लॅपटॉप सह मोबाईल) जप्त करण्यात आली आहेत. सध्या दानिश सय्यद उर्फ हुसेन अब्दुला याच्याकडून चौकशी सुरू असून, त्याचे इतर कोणाशी संबंध आहेत का याबाबतही तपास सुरू आहे. या कारवाईनंतर भोसरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.





