महापाैर पाणी द्या, नाय तर खुर्च्या खाली करा ; पाणी टंचाईवरुन विरोधक आक्रमक

पिंपरी ( महा ई न्युज ) – पिंपरी चिंचवड शहरात पाणी टंचाईवरुन सत्ताधारी भाजप विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शहरातील अनेक भागात कृत्रिम पाणी टंचाईने महिला हैराण झाल्या आहेत. याबाबत शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यावरुन राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे नगरसेवकांनी आज ( शनिवारी) महापालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन केले. याप्रसंगी महापाैर पाणी द्या, नाय तर खुर्च्या खाली करा, पाणी चोर पाणी चोर, भाजप सरकार पाणी चोर, दारु घरपोच मिळेल पण पाणी मिळणार नाही, अशा घोषणा देवून पालिका परिसच दणाणून सोडला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेची आज (शनिवारी) सर्वसाधारण सभा दुपारी दोन सुरु होणार होती. त्याअगोदर सर्व विरोधकांनी विस्कळीत पाणी पुरवठ्यावरुन आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक मयुर कलाटे, नाना काटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संजय वाबळे, समीर मासूळकर, विनोद नढे, राहुल भोसले, विक्रांत लांडे, संतोष कोकणे, राजू बनसोडे, नगरसेविका वैशाली काळभोर, अपर्णा डोके, सुलक्षणा धर, संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, उषा काळे, सुमन पवळे, माई काटे, अनुराधा गोफणे, पोर्णिमा सोनवणे, निकिता कदम, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, सुलभा उबाळे, नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शीले, अश्विनी वाघमारे, मनसेचे सचिन चिखले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. महापालिका दररोज 480 ते 500 एमएलडी पाण्याचा उपसा करते. तरीही, सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. विरोधकांसह सत्ताधारी देखील विस्कळीत पाणी पुरवठ्यावरुन वैतागले आहेत. वारंवार बैठका घेऊन देखील आयुक्त काहीच करत नाहीत. केवळ बैठकावार सुरु आहे. मागील काही दिवसात अधिकारी नुसते आठवडे मागवून घेत आहेत. परंतू, पाणीपुरवठा सुरळीत करत नाहीत. त्यामुळे सत्ताधा-यांनी पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, असे यावेळी त्यांनी सागितले.





