भारतीय पासपोर्टची रँकिंग घसरली, पहिल्या १०० देशांच्या यादीतून बाहेर

नवी दिल्ली | भारतीय पासपोर्ट हे नागरिकत्व सिद्ध करणारे दस्तऐवज मानले जाऊ शकत नाही, या परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानावरून देशभरात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आता एका आंतरराष्ट्रीय अहवालामुळे चिंता वाढली आहे. जागतिक स्तरावर भारताच्या पासपोर्टची रँकिंग घसरली असून, भारत पहिल्या १०० देशांच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे.
‘ग्लोबल सिटिझन सोल्युशन्स’ (Global Citizen Solutions) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स २०२६’ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय पासपोर्ट १२५ व्या स्थानावर पोहोचला आहे. या क्रमवारीत नेहमीप्रमाणे युरोपीय देशांचा वरचष्मा कायम राहिला आहे.
या अहवालानुसार, एकूण १९७ देशांच्या यादीत भारताला १२५ वे स्थान मिळाले आहे. २०२५ मध्ये भारत १२४ व्या स्थानावर होता, म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताची एका स्थानाने घसरण झाली आहे. या यादीत नामिबिया हा देश भारताच्या एक स्थान पुढे म्हणजेच १२४ व्या क्रमांकावर आहे, तर अझरबैजान १२६ व्या स्थानावर आहे. जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारताची घसरण झाली असली, तरी २०२१ मधील १२७ व्या स्थानाचा विचार करता भारताच्या स्थितीत काहीसी सुधारणा झाली आहे.
हा निर्देशांक केवळ व्हिसा-मुक्त प्रवासावर आधारित नसून जागतिक गतिशीलता, गुंतवणुकीच्या संधी आणि राहणीमानाचा दर्जा अशा तीन महत्त्वाच्या निकषांवर आधारित असतो.
हेही वाचा
मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील ३ तास धोक्याचे! हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ जारी
२६ देशांमध्ये ‘व्हिसा-मुक्त’ प्रवेश
अहवालानुसार, भारतीय पासपोर्टधारकांना जगातील २६ देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ प्रवेश मिळतो. यात भूतान, जमैका, नेपाळ, पॅलेस्टाईन, ट्युनिशिया आणि अंगोला या सारख्या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. दुसरीकडे, अमेरिका, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, चीन आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या जगातील महत्त्वाच्या ८८ देशांना भेट देण्यासाठी भारतीय नागरिकांना अजूनही पूर्व-व्हिसाची आवश्यकता असते.
टॉप १० देशांमध्ये युरोपचा दबदबा
ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स २०२६ मध्ये पहिल्या १० देशांमध्ये नऊ देश युरोप खंडातील आहेत. स्वीडनने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर आशिया खंडातील एकमेव सिंगापूर हा देश पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकला आहे.
जगातील टॉप १० शक्तिशाली पासपोर्ट:
१. स्वीडन
२. स्वित्झर्लंड
३. फिनलंड
४. जर्मनी
५. नेदरलँड्स
६. डेन्मार्क
७. आयर्लंड
८. युनायटेड किंगडम
९. नॉर्वे
१०. सिंगापूर





