भाजप नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्याहस्ते वाहतूक पोलिसांना रेनकोट

पिंपरी – सांगवी वाहतूक विभाग आणि रहाटणी येथील चंद्रकांत युवा मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रहाटणीचे विद्यमान नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या शुभहस्ते जवळपास शंभर वाहतूक पोलिसांना रेनकोट वाटप करण्यात आले.
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना आहोरात्र पेट्रोलींग करावी लागते. त्यातच पावसाळा सुरू असल्याने त्यांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरभर फिरावे लागते. त्याच्या गतीमान कामकाजाचा विचार करता सांगवी वाहतूक विभागाच्या वतीने रेनकोट वाटप कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते शंभर वाहतूक पोलिसांना पिवळ्या रंगाचे रेनकोट वाटप करण्यात आले. त्यामध्ये महिला पोलिस कर्मचा-यांचाही समावेश होता. यावेळी परिमंडळ तीनचे वाहतूकचे सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, युवा कार्यकर्ते शुभम नखाते, उद्योजक अमोल नखाते, स्वप्नील नखाते, आदी उपस्थित होते.
चंद्रकांत नखाते म्हणाले की, पोलीस हा नागरिकांच्या सुरक्षेचा महत्वाचा घटक आहे. सध्या सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत आहे. दुचाकीवरून आलेले चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढतात. अशावेळी पोलिसांना त्याचा पाठलाग करावा लागतो. वाहतूक पोलिसांना असे चोरटे पकडण्यासाठी चौकांमध्ये नाकाबंदी करावी लागते. अशावेळी पावसाळ्यात पोलिसांची धांदल उडते. परिणामी चोरटे पसार होण्याची दाट शक्यता असते. म्हणून, पोलिसांना पिवळ्या रंगाचे रेनकोट वाटप करण्यात आले आहेत.





