breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळालेला पुरस्कार हा राष्ट्रवादीसाठी ‘आरसा’

माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची टीका
राष्ट्रवादीने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता
पिंपरी । प्रतिनिधी
राज्य शासनाचा प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे भाजपाच्या सत्ताकाळात विकासकामे झाली नाही, लोकाभिमूख कारभार झाला नाही, असे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडी सत्तेत असलेल्या राज्य सरकारनेच ‘आरसा ’दाखवला आहे, अशी टीका भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षेनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्घीस दिलेल्या पत्रकार ढाके यांनी म्हटले आहे की, राजीव गांधी प्रशास कीय गतिमानता अभियान या राज्यस्तरीय स्पर्धेत सन २०२१-२२ या वर्षात प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे. कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व कार्यपद्धतीचा अंगीकार, ई- गव्हर्नन्स, लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमात पालिका अव्वल ठरली आहे. दहा लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक राज्य शासनाने जाहीर केले, ही बाब पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने २० वर्षे सत्ता भोगली. मात्र, लोकाभिमूख कामे झाली नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी २०१७ मध्ये सत्ता परिवर्तन घडवले. भारतीय जनता पार्टीच्या हातात शहराचा कारभार दिल्यानंतर प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्वांतत्र्य तर दिलेच, त्याशिवाय सकारात्मक निर्णयही घेतले.
भाजपा काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रशासकीय कामकाजामध्ये नवनवीन संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार केला आहे. शिवाय लोकाभिमुख कार्यालयाचे व्यवस्थापन केले असून, नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळेच महापालिकेचे कामकाज राज्यात अव्वल ठरले असून, त्यासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. नागरिकांचा सहभाग व योगदान यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही ढाके यांनी म्हटले आहे.
आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे : ढाके
भाजपाच्या काळातील विकासकामे आणि कोविड काळात लोकांना दिलेली सेवा ही राज्यात लक्षवेधी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक पदाधिकारी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर टीका करीत आहेत. आता राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख पक्ष असताना झालेल्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रथम क्रमांक आला. संपूर्ण राज्यात शहराचा लौकीक झाला. स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार झाला, असा आरोप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केला. मात्र, स्मार्ट सिटीतीलच कामांसाठी सुरत येथे झालेल्या सोहळ्यात ओपन डेटा विक, क्लायमेट चेंज आणि प्लेस मेकींग अशी तीन पारितोषिके महापालिकेला मिळाली आहेत. देशातील ६२ शहरांत झालेल्या स्पर्धेतील ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. आणखी विविध स्पर्धांमध्ये महापालिका अव्वल राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन नागरिकांची दिशाभूल करण्याचे राजकारण करण्यापेक्षा आपण सत्तेत असताना काय-काय चुका केल्या? याचे आत्मचिंतन करावे, असा सल्लाही नामेदव ढाके यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button