‘प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं’; नारायण राणे यांचं वक्तव्य

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच भाजपासह आरएसएसचा उल्लेख करत मोठं विधान केलं होतं. देशात लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे देशातील हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळांवर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे संबंधित मंदिरांना भारतीय लष्कराने संरक्षण द्यावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. दरम्यान, यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांची आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोस्ती झाली आहे. त्यामुळे त्यांची विचारसरणी तिकडे चालली आहे. असं असेल तर प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, हे भयानक विधान आहे. धार्मिक स्थळावर हल्ला होणार, याची माहिती प्रकाश आंबेडकरांना कोणत्या मार्गाने मिळाली? हे माहीत नाही. पण हे भयानक आहे. भाजपा हा राष्ट्राभिमानी पक्ष आहे. भाजपाची केंद्रात दहा वर्षे सत्ता आहे. एकच पंतप्रधान आहेत. त्यामुळे अशा अफवा पसरवल्या जात असतील, तर याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी तुषार कामठे
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि आरएसएसचं राजकारण लक्षात घेता, हिंदूंची जिव्हाळ्याची पाच मंदिरे आहेत, ती लक्ष्य होऊ शकतात. यामध्ये ज्ञानव्यापी मशीद, रामजन्मभूमी अयोध्या, मथुरेचं शाही ईदगाह ही धार्मिक स्थळं कदाचित लक्ष्य केली जाऊ शकतात. म्हणून वंचित बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की, निवडणूक होईपर्यंत ही मंदिरे लष्कराच्या ताब्यात देण्यात यावीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.