Breaking News : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी तुषार कामठे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा : शहरात राष्ट्रवादीला मिळाला युवा चेहरा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला अखेर शहराध्यक्ष मिळाला असून, बहुप्रतिक्षीत असलेल्या पदावर माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पद रिक्त होते. त्याजागी माजी आमदार विलास लांडे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे आणि काशिनाथ जगताप यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, शरद पवार गटाकडून युवा चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्यांनी नियुक्तीपत्र घेतले. यावेळी आमदार रोहीत पवार, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तुषार कामठे यांनी भारतीय जनता पार्टीकडून तिकीट घेतले होते. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पिंपळे निलख प्रभागातून निवडणूक जिंकली होती. महापालिकेतील सत्ताकाळात त्यांचे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाशी मतभेद होते. त्यामुळे नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच महाविकास आघाडी सत्ताकाळातील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
दरम्यान, अजित पवार यांनी भाजपा- शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार गटाचे शहराध्यक्षपद रिक्त होते.
तुषार कामठे यांनी शहराध्यक्षपदी जबाबदारी स्वीकारली असून, आगामी काळात भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याविरोधात कामठे मोहीम उघडणार आहेत, असे चित्र आहे.