पिंपरी / चिंचवड

बावधन येथील नाल्यात पोत्यात सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला

मित्रांनीच केला किरकोळ कारणावरून खून

पिंपरी l प्रतिनिधी

बावधन येथील एका नाल्यामध्ये पोत्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा चार दिवसात पोलिसांनी छडा लावला असून चौघांना अटक केली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रांनी हा खून केल्याचे समोर आले आहे.

सुनील मुना चौहान (वय २६, रा बावधन, पुणे. मुळ राज्य बिहार), मुन्ना फुनी चौहान (वय ४०), योगेन्द्र श्रीगुल्ले राम (वय ४०, मुळ रा. उत्तर प्रदेश), बलिंदर श्रीगुल्ले राम (वय ३६, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजु दिनानाथ महातो (वय ३६, रा. कोलकत्ता सध्या रा बावधान, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कोणीतरी अज्ञात कारणास्तव व्यक्तीचा खून करून, त्याचे हातपाय बांधुन, त्यास पांढया रंगाचे दोन पोत्यात गुंडाळुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने बावधन येथील नाल्यामध्ये टाकून दिल्याचा प्रकार १७ एप्रिल रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी मयत बॉडी पडलेले ठिकाणापासून जवळपास चारही दिशांना सीसीटीव्ही कॅमेरे कोठे बसविण्यात आले आहेत हे पाहणेकरीता वेगवेगळ्या टिम करून चारही दिशांना रवाना केल्या. घटनास्थळाच्या जवळील सलग दोन दिवस रात्री सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना मयत बॉडी मिळण्याच्या पाच दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस हायवेचे बाजूचे सव्हिस रोडने दोन दु-व्हिलर घटनास्थळावर येवून काही तरी संशयास्पद हलचाली करताना दिसून आले. त्यानंतर घटनास्थळाचे आजुबाजुस असणारे १०० पेक्षा अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तपासलेनंतर एका अॅक्टीव्हा दुचाकीवर दोन इसम त्यांचे मध्ये पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये काहीतरी घेवून जात असताना दिसुन आलेने त्या अॅक्टीव्हा गाडी बाबात माहिती घेतली असता ती गाडी बावधन येथील डी पॅलेस हॉटेल जवळ असणाऱ्या चाळीत राहणाऱ्या इसमांची असल्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यांनतर चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा खून चौघांनी केला असल्याचे कबूल केले.

मयत इसम हा आरोपींबरोबरच बिगारी काम करायचा व सोबत राहत होता. मयत इसमाचे व आरोपी सुनील मुना चौहान यांच्यात झालेल्या वादावादीमुळे त्याने मयत इसम राजु महातो याचा हाताने गळा दाबुन तो बेशुध्द झालेनंतर इतर इसमानी त्याचे हात व पाय बांधून त्यास मोकळया पांढया रंगाच्या दोन गोण्यांमध्ये भरुन, दुचाकीवरुन बावधन पुणे येथील मुंबई बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या नाल्याचे जवळ घेवून जावुन, नाल्याच्या पाण्यात कोणाला दिसू नये अशा पध्दतीने टाकून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. आरोपींना मंगळवारी (दि. १९) रात्री आठ वाजता अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डीसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोन्याबापू देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक यलमार, सहाय्यक फौजदार बंडु मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, रितेश कोळी, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, दत्ता शिंदे, महेश मोहोळ, विनोद मोहिते, मनोज गोसावी, आबा सावंत, संतोष डामसे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button