कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला
रिव्हॉल्वरचा धाक दाखवत अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला झाला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप होत आहे. रिव्हॉल्वरचा धाक दाखवत अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करत गाड्यांची ही तोडफोड करण्यात आली आहे. कल्याणजवळील वडवली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांचा मुलगा वैभव पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्र पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील टीम वडवली परिसरातील निर्मल स्टाईल भागात कारवाईसाठी गेली. सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानंतर अनधिकृत चाळीची पाहणी करण्यास पथक घटनास्थळी पोहोचताच त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील त्यांच्या साथीदारसह घटनास्थळी आले. त्यांनी या पथकाला थेट शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. वैभव पाटील याने रिव्हॉल्वर काढून अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकी दिली. एका कर्मचाऱ्याला कानाखाली मारले, तर दुसऱ्याला काठीने मारहाण केली.
हेही वाचा – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेची भेट
वाहनांची तोडफोड
केडीएमसीच्या वाहनांची तोडफोड देखील शिवसेनेच्या या लोकांनी केली. “येथे आमची गुन्हेगारी चालते, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी इकडे फिरायचे नाही,” “तुम्ही पुन्हा आलात तर गोळ्या घालू” अशी धमकी दिल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला. कल्याण खडकपाडा पोलीस चौकात या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
चार वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार. चार वर्षांपूर्वी याच आरोपींनी महानगरपालिकेच्या दोन ते तीन कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत मारहाण केली होती. आताच्या प्रकरणातील आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे, असे कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या परिसरातील अनधिकृत बांधकामे ही या माजी नगरसेवकाची आहे. त्यामुळे त्यांच्यावरती एमआरटीपी अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अधिकारी वर्गाने केली आहे.