सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेची भेट

जालना : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज जालन्यात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आणि अंजली दमानिया यांनी थेट धनंजय मुंडेंचे नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच, त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.
गेल्याच आठवड्यात कळंब येथील महिलेची हत्या झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी ट्विट करुन संबंधित महिलेचा वापर करुन दिवंगत संतोष देशमुख यांचे चारित्र्यहनन करण्याचा डाव असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, संतोष देशमुख प्रकरणावरुन या भेटीला वेगळं महत्व आहे. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी एका सभेमध्ये जरांगे यांना चक्कर आली होती, त्यावेळी मी ठरवलं होतं की आपण भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करावी. त्यामुळे, आज भेट घेऊन जरांगे यांची विचारपूस केल्याचे अंजली दमानिया यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.
हेही वाचा – पीसीसीओईला राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार
भेटीवेळी याठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेदेखील उपस्थित होते. संतोष देशमुख खून प्रकरणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मला त्या चार्टशीटमध्ये सगळ्याच गोष्टी अर्धवट वाटत आहेत. आरोपी सुदर्शन घुलेच स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आले, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं. कारण, त्यात खुनानंतर पुढे काय झाले? तो कुठे गेला? कोणाच्या मदतीने बाहेर राहिला? तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही ? याबाबत चकार शब्द सुद्धा स्टेटमेंटमध्ये लिहिलेला नसल्याचे दमानिया म्हणाल्या.