एसीबीच्या छापेमारीत अधिकाऱ्यांच्या घरात मोठे घबाड
अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी, लाच प्रकरणानंतर ACB कडून झाडाझडती

पुणे : पुणे शहरातील ससून रुग्णालये गेल्या काही वर्षांपासून वादाग्रस्त ठरत आहे. ससूनमधून ड्रग्स पुरवठ्याचे रॅकेट समोर आले होते. त्यानंतर ससूनमधून येरवडा कारागृहातील कैदी पळाला होता. या प्रकरणांची धुळ शांत होत नाही तोपर्यंत ससूनमधील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या घरावर छापेमारी सुरु झाली. त्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाले आहे.
अशी मिळाली अपसंपदा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेताना दोघांचा बुधवारी अटक केली होती. ससूनमध्ये अधिकारी असलेल्या जयंत चौधरी आणि सुरेश बनवले यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांच्या घरात छापेमारी सुरु केली आहे. त्यात जयंत चौधरी यांच्याकडून ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर सुरेश बनवले यांच्या घरातून तब्बल १ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एसीबीच्या छापेमारीत दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात मोठे घबाड मिळाले आहे.
हेही वाचा – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेची भेट
पुणे शहरातील ससून रुग्णालये ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्यानंतर देशभर चर्चेत आले. त्यानंतर पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्यानंतर त्याची चर्चा अनेक दिवस झाली. त्यानंतर बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.
महाविद्यालयातील फर्निचर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे त्यांनी लाच मागितली होती. दहा लाखांचे बिल काढण्यासाठी ही लाच मागितली. बुधवारी त्यांना पकडल्यानंतर त्यांनी जमा केलेली अपसंपदा शोधून काढण्याचे काम एसीबीने सुरु केले. दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराबर छापेमारी करत मोठ्या प्रमाणावर रोकड आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. या अधिकाऱ्यांना आज न्यायालयातही हजर करण्यात येणार आहे.