100 कोटी रुपये वसुली प्रकरणाचा तपास ईडीने करावा-राम कदम
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रूपये जमा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने राजीनाम्याची शक्यता मात्र फेटाळली आहे.
वाचा :-‘लिहून ठेवा, 4 एप्रिल 2021’; ठाकरे सरकार पडणार-भाजप प्रवक्ते अवधूत वाघ
याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते राम कदम यांनी या सर्व प्रकरणाचा तपास ईडीने करावा, अशी मागणी केली आहे. राम कदम यांनी ट्विट करत यासंदर्भात मागणी केली आहे. 100 कोटी रुपयांची वसूली समोर आली आहे. आमची मागणी आहे ईडीने याची चौकशी करावी, असे ते म्हणाले.
यासोबतच, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतःची नार्को टेस्ट करत स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करावा, अशी मागणी करणारे ट्विट देखील राम कदम यांनी केले आहे.दरम्यान, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहिल, असे त्यांनी म्हटले आहे.





